
मराठी साहित्यातील विनोदी लेखक पु.ल. देशपांडे ( PU LA Deshpande) अर्थातच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (Purushottam Laxman Deshpande) यांची आज 101वी जयंती. ( PU LA Deshpande Birth Anniversary) जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या गूगलनेही आजच्या दिवशी खास श्रद्धांजली अर्पण केली आहे. गूगलने डूडल (LA Deshpande Google Doodle) तयार करुन पु ल देशपांडे यांना अभिवादन केले आहे. गूगलच्या होम पेजवर डूडल बनणे ही एक अत्यंत मानाची, आणि त्या त्या क्षेत्रातील व्यक्तिमत्वासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि सन्मानाची बाब मानली जाते. आज हा सन्मान आपल्या 'भाई' अर्थातच पुलंना मिळाला आहे.
लक्ष्यवेधी गूगल डूडल
पू लं देशपांडे यांच्यावर बनवलेले आजचे गूगल डूडल हे खास वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका आनंदी मुद्रेत पुलं बसले आहेत. ते काही गात आहेत की काही सांगत आहेत हे कळणे कठीण. परंतू हातात एक सूरपेटी त्या सुरपेटीच्या दर्शनी भागावर पु. ल. देशपांडे अशी झळकणारी नावाची अक्षरे. बरं, या पेटीची रचनाही इतकी मजेशीर आणि तितकीच लक्ष्यवेधी. अशी की एका नजरेने पाहावे तर ती सुरपेटी वाटावी खरी. परंतू आणखी बारकाईने पाहावी तर ती सुरपेटी जणू काही पुस्तकांची उघडलेली पानेच भासावीत अशी. त्या पेटीतून उमटणारे रंगीबेरंगी तरंग आणि पार्श्वभूमीला मोठमोठाली अर्धवर्तुळं. जणून सप्तरंग भासावीत तशी. अशी ही डूडलची रचना.
विनोदी साहित्यात मोलाची भर
पु. ल. देशपांडे यांचा जन्म मुंबई येथे 8 नोव्हेंबर 1919 या दिवशी झाला. स्वातंत्र्यपूर्व भारतातील आणि टिळक पर्व संपून गांधीपर्व सुरु होणारा तो काळ. भारताची स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्य, पहिला स्वातंत्र्यदिन, भारताची फाळणी, पंडीत नेहरु यांचे ते ऐतिहासीक भाषण, महात्मा गांधी यांची हत्या असा एका काळाचा पट पाहिलेले हे व्यक्तीमत्व. अर्थात या सर्वांचा फारसा तपशील पु लंच्या लिखानात फारसा पाहायला मिळत नाही. परंतू, मराठी साहित्यात विनोदी साहित्यात मात्र त्यांनी मोलाची भर घातली हे नक्की. (हेही वाचा, PU LA Deshpande 101st Anniversary: पु. ल. देशपांडे, मराठी साहित्य विश्वातील एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व; 101 व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या खास गोष्टी)
बहुआयामी पुलं
कथा, कादंबरी, विनोदी लिखाण, नाटककार, नट, संगित दिग्दर्शक (संगितकार), अभिनय अशा एक ना अनेक भूमिकांमध्ये पु.ल. लिलया वावरताना दिसतात. यासोबतच शिक्षक, नकलाकार, कवी, पेटीवादक, वक्ते म्हणूनही पुलं उभ्या महाराष्ट्राला परीचित. याशिवाय नभोवाणी (रेडिओ), एकपात्री नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी अशा एक ना अनेक क्षेत्रांत पुल देशपांडे यांचे काम पाहायला मिळाले. मराठी भाषेचा अभ्यास आणि त्यावरील पकड हा पुलं यांचा हातखंडा होता. त्यामुळेच मराठी भाषेत ते चांगला विनोद आणि कोटी करु शकले. 12 जून 2000 या दिवशी पुणे येथे त्यांचे निधन झाले.