Nirjala Ekadashi 2020 Shubh Muhurat and Puja Vidhi: प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा 2 एकादशा असतात. अशा मिळून वर्षभरात एकूण 24 एकादशा असतात. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला 'निर्जला एकादशी' (Nirjala Ekadashi) असे म्हणतात. वर्षभरातील सर्व एकादशांपैकी सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण एकादशी म्हणून 'निर्जला एकादशी' मानली जाते. स्कंद पुराणानुसार वर्षभरात एकाही एकादशीला व्रत करु शकला नाहीत तर केवळ निर्जला एकादशीला व्रत केल्यास पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. महाबलशाली भीमाने निर्जला एकादशीचे व्रत करुन सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त केले होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या एकादशीला 'भीमसेनी एकादशी' असेही म्हणतात. यंदा निर्जला एकादशी 2 जून रोजी आहे.
निर्जला एकादशी दिवशी भगवान श्री विष्णुची पूजा आणि व्रत केले जाते. विशेष महत्त्व असलेल्या या एकादशी निमित्त व्रत केल्याने पुण्याची प्राप्ती होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. तसंच मरणानंतर मोक्षप्राप्ती होते, अशीही या एकादशीची महती आहे.
निर्जला एकादशी व्रताचा शुभ मुहूर्त:
एकादशी तिथि आरंभ: 1 जून दुपारी 2:57 वाजता
एकादशी तिथि समाप्त: 2 जून दुपारी 12:04 वाजता
एकादशी व्रत: 2 जून 2020
व्रत पारण मुहूर्त: भाविक 2 जून रोजी श्रीविष्णूची पूजा दुपारी 12:04 पर्यंत करु शकता.
निर्जला एकादशी पूजाविधी:
निर्जला एकादशी निमित्त सकाळी लवकर उठून स्नान करुन भगवान विष्णूंची पूजा करावी. पूजा करताना विष्णूच्या प्रतिमेला/मुर्तीला हळद-कुंकू लावाले. त्यानंतर अक्षता, चंदन लावावे. पिवळे फुलं अर्पण करावे. दिवा-अगरबत्ती ओवाळून नमस्कार करावा. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्रोत्चार करावा. त्यानंतर निर्जला एकादशीच्या कथेचे पठण करावे. कथापठण केल्यानंतर आरती करुन विष्णुची प्रार्थना करावी.
निर्जला एकदाशी निमित्त उपवास करण्याची प्रथा आहे. परंतु, हा उपवास निर्जळी म्हणजे पाणी न पिता करायचा असतो. त्यामुळे आपल्या प्रकृतीचा विचार करुनच उपवास धरावा. संपूर्ण दिवस फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी पूजा करुन उपवास सोडावा. तत्पूर्वी ब्राह्मणांना दानधर्म करावा.