नवरात्रोत्सव (Navratri 2022) हा नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा उत्सव आहे. हिंदूंच्या प्रमुख आणि महत्वाच्या सणांपैकी तो एक आहे. नवरात्र हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ 'नऊ रात्री' असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा होतो. नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये महालक्ष्मी, सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यंदा 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रीचा उत्सव साजरा होईल.
नवरात्रीबाबत लोकप्रिय असलेल्या आख्यायिकेनुसार, महिषासुर राक्षसाने निर्माण केलेली दहशत थांबवण्यासाठी दुर्गा देवी शक्तीच्या रूपात जन्माला आली. दुर्गा देवी आणि महिषासुर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला.
नवरात्रोत्सव हा माता दुर्गा या संकल्पनेच्या भक्तीचा आणि दैवी शक्तीच्या पूजेचा सर्वात शुभ आणि अद्वितीय कालावधी मानला जातो. ही उपासना प्रागैतिहासिक काळापासून म्हणजे वैदिक युगापूर्वीपासून चालत आलेली आहे. जगात जेव्हा जेव्हा तामसी, आसुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सात्त्विक अन् धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुनःपुन्हा अवतार घेते, असा समज आहे.
तर अशा या पवित्र उत्सवानिमित्त, खास मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून तुम्ही तुमचे मित्र-मैत्रिणी, प्रियजन, नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे, म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात.
यासह, रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि दसऱ्याच्या दिवशी देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली व रामाने रावणाचा वध केला, असा समजही आहे. म्हणून दसरा हा सण विजयाचे प्रतीक समजून त्याला विजयादशमी असेही म्हणतात.