
Kanya Pujan 2020 Significance: 17 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसांत देवीच्या विविध रुपांची उपासना केली जाते. नवरात्र उत्सव काळात आदिशक्ती, नारीशक्तीचा जागर केला जातो. सलग नऊ दिवस महाषासुरांशी युद्ध करुन त्याच्यावर विजय मिळवणाऱ्या देवीच्या तेजस्वी रुपाची पूजा नवरात्रोत्सवात केली जाते. असं म्हणतात की, प्रत्येक स्त्री मध्ये आदिशक्तीचा अंश असतो. तिचे बाल रुप म्हणजेच कुमारिका हे साक्षात देवीचे रुप मानले जाते. त्यामुळे नवरात्र उत्सवात 'कन्या पूजन' (Kanya Pujan) केले जाते. त्यास 'कुमारिका पूजन' किंवा 'बालिका पूजन' असेही म्हणतात. कन्या पूजनात 10 वर्षांपर्यंतच्या मुलींच्या पायाचे पूजन करुन त्यांना नमस्कार करण्यात येतो.
अश्विन शुक्ल सप्तमी, अष्टमी दिवशी सात किंवा नऊ मुलींचे पूजन करण्यात येते. सोबतीला एका मुलाचेही पूजन केले जाते. शक्यतो 9 मुलींची निवड पूजनासाठी केली जाते. 9 बालिकांच्या रुपात देवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. यंदा सप्तमी 23 आणि अष्टमी 24 ऑक्टोबर रोजी आहे. त्यामुळे या दोन दिवशी कन्या पूजनाचा कार्यक्रम करता येईल. मात्र यंदा कोविड-19 संकटाचे सावट असल्याने विशेष खबरदारी घेत कन्या पूजन करावे लागणार आहे. (Bhondla 2020: नवरात्रीत का साजरा केला जातो भोंडला? जाणून घ्या महत्व)
कन्या पूजन करण्याची पद्धत:
# कन्या पूजनासाठी घरी आलेल्या बालिकांचे पाय पाणी आणि दुधाने स्वच्छ धुऊन कोरडे करा.
# मुलींना हळद-कुंकू लावून त्यांची पूजा करा.
# पानाचा विडा देऊन हातात लाल धागा बांधा.
# त्यानंतर प्रसाद द्या. काही ठिकाणी लाह्या, केळी, खोबरं, खजूर असा प्रसाद दिला जातो.
# काही ठिकाणी गोडाचे जेवण दिले जाते. तर काही ठिकाणी खाऊ देतात.
# एखादी भेटवस्तू मुलींना दिली जाते. अलिकडे पुस्तकं, पेन, पेन्सिल अशा उपयुक्त वस्तू देण्याकडे अनेकांचा कल असतो.
प्रदेशानुसार कन्या पूजन करण्याची पद्धत वेगळी असली तरी त्यामागील उद्देश एकच आहे. त्यामुळे मनभावे केलेले पूजन नक्कीच फलदायी ठरते. नवरात्रोत्सव संपूर्ण भारतात अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र यंदा अगदी साध्या स्वरुपात हा उत्सव साजरा होईल.