
सध्या देशभरात नवरात्रीचा (Navaratri) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी दुर्गापूजा (Durga Puja) साजरी होते. बंगालमधील लोक नवरात्रीचे शेवटचे 5 दिवस खास पद्धतीने साजरे करतात. यंदा 5 दिवसाचा विशेष उत्सव 22 ऑक्टोबरपासून 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या (Dussehra) उत्सव साजरा केला जाईल. बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पंडालमध्ये धुनुची नृत्य (Dhunuchi Naach) केला जातो, तर दशमीच्या दिवशी सिंदूर खेला (Sindur Khela) खेळला जातो. आपण नेहमीच या दोन्ही गोष्टींचे फोटो, व्हिडिओ पाहत आलो आहोत. तर आज आम्ही सांगणार आहोत या दोन्ही पारंपारिक गोष्टींचे महत्व.
सिंदूर खेला -
बंगाली लोक, जगाच्या पाठीवर कुठेही असोत, ते दुर्गापूजेचा उत्सव थाटामाटात साजरा करतात. बंगालमध्ये दशमीला सिंदूर खेळण्याची परंपरा आहे. विजयादशीच्या दिवशी सिंदूर खेळून देवीची पाठवणी केली जाते. सिंदूर म्हणजे लाल कुंकू आणि खेला म्हणजे खेळने. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला हा खेळ खेळतात. या विधीमध्ये सर्व महिला एकमेकींच्या गालावर सिंदूर लावतात. यावेळी, वातावरण रंग आणि गुलालामुळे रंगपंचमी सारखे भासते.
असे मानले जाते की नवरात्रात आई दुर्गा तिच्या आई-वडिलांसह पृथ्वीवर येते. आईचा सन्मान करण्यासाठी विविध पूजा-अर्चना आणि पदार्थ बनवले जातात. नवरात्रानंतर आई आपल्या घरी परतते, म्हणून तिला निरोप देताना सिंदूर लावला जातो व म्हणूनच हा खेळ खेळला जातो. (हेही वाचा: नवरात्रात अष्टमीच्या निमित्ताने अभिनेत्री शिल्पा शेट्टीने केली कन्या पूजा; 9 मुलींचे पाय धुवून केली त्यांची पूजा)
धुनुची नृत्य -
धुनुची नृत्य ही बंगालची एक अतिशय प्राचीन परंपरा आहे, जी प्रत्येक दुर्गापूजा पंडालमध्ये दिसून येते. वास्तविक, धुनुची हे एक मातीचे भांडे असते, ज्यामध्ये कोरडे नारळ, जळता कोळसा, कापूर आणि थोडी धूप ठेवली जाते. ही मातीचे धुनुची हातात धरून नृत्य करण्याच्या कलेला धुनुची नृत्य म्हणतात. असा विश्वास आहे की धुनुची नृत्य प्रत्यक्षात शक्तीचे रूप आहे आणि तिचा संबंध महिषासुर वधाशी आहे. पुराणात असे नमूद केले आहे की, अत्यंत शक्तिशाली अशा महिषासुराचा वध करावा यासाठी देवतांनी देवीची स्तुती केली होती. या असुराचा वध करण्यापूर्वी देवीने आपली शक्ती आणि सामर्थ्य वाढविण्यासाठी धुनुची नृत्य केले होते व ही परंपरा आजही कायम आहे.