Navratri 2019 Colors Importance: नवरात्रीत का दिले जाते रंगांना महत्व, जाणून घ्या यंदाच्या नवरंगाचे महत्व
Navratri 9 colors (Photo Credits: Google)

अश्विन महिन्यात येणा-या शारदीय नवरात्रीसाठी (Navratri) सर्वत्र जोरदार तयारी सुरु झाली आहे. यात लोकांची विशेषत: महिलांची तयारी सुरु झाली आहे ती नवरात्रीसाठी नवरंगाचे कपड्यांची जमवाजमव करण्यासाठी. यंदा नवरात्रीत पावसाचे सावट जरी असले तरीही लोकांचा तसेच विशेष करुन महिलांचा उत्साह मात्र दांडगा असणारच हे वेगळं सांगायला नको. आपण दरवर्षी नवरात्री आली की, त्यावर्षीचे नऊ रंग कोणते आहेत हे जाणून घेण्यास उत्सुक असतो. कारण त्या रंगांचे कपडे घालून घराबाहेर पडणे,ऑफिसात फोटो काढणे, सोशल मिडियावर शेअर करणे हा आपला मुख्य उद्देश असतो. मात्र कधी आपण असा विचार केला आहे की या रंगांना इतके महत्व का दिले जाते. आपण जो रंग परिधान करतो त्या रंगांचा नकळत आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या वलयावर विशिष्ट असा परिणाम होत असतो.

म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर पाहूयात नवरात्रीच्या या नवरंगाचे वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रीय कारणे...

दिवस पहिला: 29 सप्टेंबर-नारिंगी रंग (Orange)

हा रंग परिधान केल्यास तुमच्या व्यक्तिमत्वात एक आकर्षक तेजोवलय निर्माण होतं. तेज, प्रसिद्धी, यशाचा हा रंग आहे. हा रंग केशरी कडे झुकल्यास याचा उपयोग योगमार्गासाठी सुद्धा होतो. हा रंग आपल्याकडे अनेक स्तरांवर मुबलकता घेऊन येतो.

हेही वाचा- Navratri 2019: घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

दिवस दुसरा: 30 सप्टेंबर- पांढरा रंग (White)

पांढरा किंवा सफेद हा रंग शुद्धता दर्शवतो. हा रंग परिधान केल्याने मनाची आणि आत्म्याची शुद्धी होण्यास मदत होते, बरेच सिद्ध पुरुष हा रंग घालतात. हा रंग शांती, विश्वास आणि स्थैर्य देतो. हा रंग विनयशीलताही देतो.

दिवस तिसरा: 1 ऑक्टोबर- लाल रंग (Red)

लाल रंग तीव्रता , उत्साह दर्शवतो. हा रंग जीवनाला ऊर्जा देतो . लाल रंग शक्तीचे प्रतीक आहे . देवीला हा रंग अत्यंत आवडतो आणि कुंकवाचा ही रंग लाल असतो. शृंगाराचा रंग लाल आणि लाल गुलाब सर्वांच्याच आवडीचा आहे. या रंगाचा पोशाख परिधान करून सूर्य उच्चीला असताना अगदी 5 मिनिटं ध्यानधारणा केली तरी जीवनात सौंदर्य येते . हेदेखील वाचा- Navratri Colours 2019: यंदा नवरात्रीचे नऊ रंग कोणते? पहा शारदीय नवरात्रीचं संपूर्ण वेळापत्रक

दिवस चौथा: 2 ऑक्टोबर- निळा (Royal Blue)

निळा रंग अथांग असतो अगदी समुद्रासारखा, आकाशासारखा. हा सर्वांना सामावून घेणारा आहे . हा रंग दृढविश्वासासाठी कारक आहे. हा रंग अंतर्ज्ञान समजण्यास मदत करतो. स्वतःबद्दलची आध्यात्मिक जाणीव करून देतो.

दिवस पाचवा: 3 ऑक्टोबर- पिवळा रंग (Yellow)

पिवळा हा आनंदी राहण्याचा रंग आहे, याने जीवनात एक happy go lucky वृत्ती येते. हा रंग आशावाद दर्शवतो. सकारात्मक दृष्टी देतो आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास देतो. माणूस सहजशील होतो.

हेदेखील वाचा- Navratri 2019: शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना कधी कराल? पहा देवीची नऊ रूप आणि तिच्या पूजेचं नवरात्रोत्सवातील वेळापत्रक

दिवस सहावा: 4 ऑक्टोबर- हिरवा (Green)

हा रंग निखळ प्रेमाचा आहे. समृद्धी आणि भरभराटीचा रंग आहे. पैसे आणि अर्थव्यवस्था या रंगाच्या अधिपत्त्याखाली येतात. हा प्रजननाचा रंग आहे. हा निसर्गाचा रंग आहे. हा रंग पाहिल्यावर डोळ्यांना शांत वाटतं आणि मनही शांत होतं.

दिवस सातवा: 5 ऑक्टोबर- राखाडी (Grey)

काळा आणि पांढरा या मधला हा रंग असल्याने या रंगामुळे, जगात black आणि white या वृत्ती व्यतिरिक्त ही बरेच अर्थ असतात, हे हा रंग समजावून देतो. हा रंग गौरव आणि प्रतिष्ठा वाढवण्यास मदत करतो . हा रंग परिधान केल्यास आपले दैवी मार्गदर्शनाचे द्वार खुले होते. देवदूतांचं संरक्षण आणि साथ आपल्याला प्राप्त होते.

दिवस आठवा: 6 ऑक्टोबर-जांभळा (Purple)

हा रंग सुरक्षेचा आहे. हा रंग आपल्या वलयाला सुरक्षित ठेवतो. हा रंग उमेदीचा, रजस तत्त्वाचा आणि उदात्तपणाचा आहे. हा रंग गूढ तत्त्वाचा , ज्ञानाचा आणि आध्यात्माचा आहे. हा सहस्त्रार चक्राचा रंग असल्याने वैश्विक ऊर्जा या रंगामार्फतच शरीरात येते

दिवस नववा:7 ऑक्टोबर- मोरपिशी रंग (peacock Green)

हा रंग मनाला उत्तेजना देतो. चित्त शांत राहतं आणि बुद्धी स्थिर राहते. जगण्यासाठी ही एक आदर्श स्थिति आहे. या रंगामुळे आध्यात्मिक जाणीव होण्यास मदत होते. सर्व सकारात्मक स्वीकारण्यासाठीचा मोकळेपणा आपोआप येतो. वृत्ती मध्ये चांगले बदल करणं सहज सोपं होऊन जातं.

नवरात्रीत असलेल्या या नऊ रंगांचे महत्व पाहून तुमचेही डोळे भिरभिरले असतील. नवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. शास्त्राप्रमाणे नवरात्रीत नऊ वेगवेगळ्या रंगाचेही महत्त्व आहे.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तसेच लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)