आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. यात वर्षभरात अनेक सणांची रेलचेल असते. मात्र वर्षभर भारतीय ज्या सणाची वाट पाहात असतो तो दिवाळी सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पाच दिवसांचा असलेला दिवाळीचा (Diwali 2020) सण यंदा 3 दिवसांचा आहे. कारण यंदा नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2020) आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. तर पाडवा आणि भाऊबीज देखील एकाच दिवशी आले आहे. त्यामुळे यंदा चाकरमान्यांची सुट्ट्या कमी झाल्या हे दु:ख मनात सलत असलं तरी या सणाचा आनंद काही कमी होणार नाही. दिवाळी खरी सुरुवात होते ते नरक चतुर्दशी दिवशी. या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करुन, कारेट फोडले जाते. यंदा 14 नोव्हेंबर दिवशी संपूर्ण देशभरात नरक चतुर्दशी होणार असून त्याच दिवशी लक्ष्मी पूजन देखील आहे.
नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. त्यास प्रमुख कारण म्हणजे पुराणातील कथेत या दिवशी असुर शक्तींचा नाश झाल्यामुळे या सणादिवशी अभ्यंग स्नान केले जातो. तसेच हे अभ्यंग स्नान करण्याचा शुभ मुहूर्त देखील असतो. Diwali 2020: यंदा दिवाळीच्या दिवशी 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग; पुष्य नक्षत्रापासून दिवाळी पर्यंत महत्त्वाच्या खरेदीचे 7 शुभ मुहूर्त!
पाहा यंदा नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान करण्याचा शुभ मुहूर्त:
14 नोव्हेंबरला सकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी हा शुभ मुहूर्त सुरु होणार असून सकाळी 6 वाजून 43 मिनिटांपर्यंत राहिल.
नरक चतुर्दशी दिवशी काय करावे:
चंद्रोदय व्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान करावे. त्यावेळी 'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।'मंत्र म्हणावा. अर्धी आंघोळ झाल्यावर आंघोळ करणार्याला औक्षण करावे. या दिजा वशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावावा. 'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।' हे सर्व केल्यानंतर तुमच्या घरात,दुकानात तसेच कार्यालय दिव्यांनी प्रज्वलित करावे. असे केल्यास नरकापासून मुक्ती मिळते असे पुराणकथेत सांगितले आहे.
नरक चतुर्दशी का साजरी केले जाते:
यामागील कहाणी अशी आहे की नरकासुर नावाचा असुर मानवांना पीडा देत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला वर दिला. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्रय आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.
थोडक्यात असुर शक्तींचा नाश करण्यासाठी नरक चतुर्दशी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे अभ्यंगस्नान करुन दिवाळीची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो.