Nag Panchami | commons.wikimedia

श्रावण (Shravan) महिना हा व्रत वैकल्यांचा महिना आहे. या महिन्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमीचा. श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस हा नागपंचमीचा (Nag Panchami) दिवस आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 दिवशी साजरी केली जाणार आहे. नागपंचमीला बहिण भावासाठी उपवास करते. यामध्ये भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. पण या उपवासामागील हिंदू शास्त्र आणि पुराण नेमकी काय कथा सांगतं हे देखील नक्की जाणून घ्या. नक्की वाचा: Nag Panchami 2024 Messages in Marathi: नागपंचमी निमित्त मराठमोळे WhatsApp Status, Quotes, SMS, Wishes शेअर करून साजरा करा श्रावणातील पहिला सण. 

नागपंचमी दिवशी भावांसाठी उपवास का केला जातो?

श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला महिला उपवास ठेवतात. 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला. तेव्हा त्याला भाऊ मानल्यावर त्यानेही जी बहीण नागाची पूजा करेल तिचं रक्षण मी नक्की करेन असं म्हटलं. त्यामुळे नागपंचमीला प्रत्येक बहीण नागाची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा करते.

नागपंचमीला सत्येश्वरीने भावाच्या मृत्यूच्या शोकामध्ये अन्न ग्रहण केले नाही. म्हणूनच स्त्रिया नागपंचमीला उपवास करतात. भावाला दीर्घायुष्य लाभावं, आयुधं मिळावी असं मानलं जातं. त्यामुळे या व्रताचं फळ भावाला मिळतो पण सोबतच बहिणींना देखील त्याचा लाभ मिळतो.

नागपंचमीची पूजा कशी होते?

शहरात नाग उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेकजणी नागपंचमीला पूजा करताना पाटावर 9 नागांच्या आकृत्या काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला महिला हातावर मेंहदी काढतात. नवी वस्त्र, दागिने परिधान करतात. नागाच्या पूजेसाठी नागाचा फोटो किंवा मातीपासून बनवलेला नाग किंवा धातूपासून बनवलेल्या नागाची पूजा केली जाते. त्याला दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच काही गव्हाची खीरीचा देखील नैवेद्य दाखवतात.

नवी वस्त्र आणि शृंगार करण्यामागील कारणं

सत्येश्वरीचा शोक पाहून नागदेवता प्रसन्न झाली. तिचा शोक कमी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी नवी वस्त्र परिधान करण्याचा मार्ग सुचवला होता. नवे दागिने घालून सजवलं. सत्यश्वरीयामुळे समाधानी झाली आणि यामुळे स्त्रिया नागपंचमीला सजून एकत्र हा सण साजरा करतात. सत्येश्वरीने नागाला तिला सोडून न जाण्याचं वचन मागतं त्यामुळे त्याचं प्रतिक म्हणून महिला नागपंचमीला मेहंदी काढतात. नाग अकृतीचं पूजन केल्याने सगुण रूपातील शिव शंकरांचं पूजन केल्यासारखं आहे.

टीप:  सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामधील  कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. दरम्यान अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.