Marathwada Liberation Day 2019: औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली हे आठ जिल्हे मिळून तयार होतो आजचा मराठवाडा. गेदावरी नदी खोरे आणि त्याच्या आसपास तब्बल 64286.7 चौरस किलोमीटर अशा विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेला प्रदेश म्हणजे आजचा मराठवाडा (Marathwada). स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक धगधगतं पर्वच आहे जणू. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला खरा. पण, मराठवाडा स्वतंत्र होण्यास तब्बल 17 सप्टेंबर 1948 हे वर्ष उजाडावं लागलं. कारण, हैदाराबद संस्थान खालसा होऊन स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश होण्यास करावा लागला एक संघर्ष. या संघर्षाला लाभलेल्या यशाचे प्रतिक म्हणूनच आज गेली 71 वर्षे मराठवाडा उभा आहे. म्हणूनच जाणून घ्या या संघर्षाची कहाणी. मराठवाडा स्वतंत्र झाल्याला यंदा 72 वे वर्ष सुरु होत आहे. त्यानिमित्त जाणून घ्या का साजरा केला जातो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (Marathwada Liberation Day)? निजामाचे हैद्राबाद संस्थान आणि भारत सरकार यांच्यातील संघर्ष घ्या जाणून
मराठवाडा इतिहास थोडक्यात
स्वतंत्र्यपूर्व हिंदुस्तान म्हणजे अनेक राजे, सरदार आणि टोळ्यांची संस्थानं, सत्ताकेंद्रांचा वेगवेगळा समूह होता. कालांतराने इंग्रज भारतात आले. व्यापाराच्या उद्देशाने हिंदुस्तानात आलेल्या इंग्रजांनी थेट हिंदुस्तानावर कब्जा केला आणि ते राज्यकर्ते झाले. यात इथे सत्तेवर असलेल्या सर्व राजांचा एक तर पाडाव झाला किंवा ते इंग्रजांच्या अंकीत गेले. निजाम राजवट असलेले हैद्राबाद संस्थानही ब्रिटीश साम्राज्याचा एक हिस्सा ठरले. मराठवाडा हा निजामी राजवटीचाच एक भाग होता. दरम्यान, हिंदुस्तानची फाळणी झाली आणि भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रं उदयास आली. स्वतंत्र भारतात असलेल्या संस्थानं आणि संस्थानिकांसमोर तेव्हा भारत किंवा पाकिस्तान असे दोन प्रस्ताव ठेवण्यात आले. हा प्रस्ताव भारत सरकार आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला प्रतिसाद देत भारतातील जवळपास सर्व संस्थानं भारतात विलिन व्हायला तयार झाली. अपवाद फक्त हैद्राबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर या संस्थानांचा. त्यातही हैद्राबाद संस्थान प्रमुख निजामाचा डाव होता की हैद्राबाद हे 'स्वतंत्र राष्ट्र' म्हणून घोषीत करायचे किंवा पाकिस्तानमध्ये सहभागी व्हायचे. इथे सुरु झाला हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि मराठवाडा मुक्ती संग्राम असा थरार.
हैद्राबाद मुक्ती संग्राम
हैद्राबाद संस्थान हे महाराष्ट्र (8 जिल्हे), आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा राज्यांमध्ये विस्तारले होते. या संस्थानाचा आवाका विस्तारित असल्यामुळे निजामाने भारत सरकारचा प्रस्ताव धुडकावला आणि थेट पाकिस्तानात सहभागी होण्याची तयारी केली. त्यासाठी त्याने सशस्त्र मार्गाचा अवलंबही केला. त्यामुळे भारत सरकारलाही सशस्त्र कारवाईच करावी लागली. तसाही हा संघर्ष अटळ होताच. कारण, हैदराबाजचा निजाम स्वत:च्या संस्थानासोबत पाकिस्तानात गेला असता तर, भारताच्या मध्यभागी पाकिस्तानचा भूप्रदेश आला असता. आणि भारताच्या भविष्यासाठी कायमचा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे भारत सरकारने थेट संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला.
रझाकार संघटनेचा सर्वसामान्यांवर जुलूम
हैद्राबाद संस्थान भारतात सहभागी करण्यात यावे यासाठी प्रचंड मोठी चळवळ उभी करण्यात आली. ही चळवळ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली होती. ही चळवळ दडपण्यासाठी निजामाने सशस्त्र मार्ग अवलंबला. त्यासाठी निजामी राजवठीस पाठिंबा देणाऱ्या कासीम रझवी याच्या रझाकार संघटनेचा मोठा हात होता. रझाकार संघटनेने सर्वसामान्य जनतेवर आतोनात अत्याचार सुरु केले होते. त्याचे पडसाद मराठवाड्यातही उमटत होते. त्यातूनच मराठवाडा मुक्ती संग्राम उदयास आला. स्वामी रामानंत तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीणारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेते मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीचे नेतृत्व करत होते.
निजाम शरण आला, हैद्राबाद संस्थान खालसा; मराठवाडा मुक्त झाला
भारती सैन्याने हैद्राबाद संस्थान आणि रझाकार संघटनेस चारी बाजूंनी घेरले. 13 सप्टेंबर 1947 रोजी भारतीय सैन्याने आपला मारा वाढवला. त्यामुळे निजामाचे सैन्य आणि रजाकारांना नमते घ्यावे लागले. अखेर हैद्राबाद संस्थान आणि निजामाचा सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस हा 17 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारला शरण आला. त्यामुळे खुद्द निजामालाही शरण यावे लागले. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सहभागी झाले. परिणामी मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलन तब्बल 13 महिने लढले गेले. या कारवाईला 'पोलीस अॅक्शन' असे संबोधले गेले. सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेली ही पोलीस अॅक्शन देशाच्या इतिहासात अजरामर ठरावी अशीच होती. या कारवाईमुळे आजचा एकसंद भारत उदयास आला. (हेही वाचा, International Literacy Day 2019: जागतिक साक्षरता दिन सुरुवात, महत्त्व आणि साक्षरतेची गरज)
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन - 17 सप्टेंबर
दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्राम संपला. मराठवाडा मुक्तही झाला. पण पुढची अनेक वर्षे 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येत नव्हता. या संग्रामनंतर काही वर्षांनी वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो. मरावाडा मुक्ती संग्राम इतिहास चिरंतन राहावा. तो सतत दृष्टीक्षेपात रहावा या विचारातून मराठवाडा मुक्तीदिन समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. या संग्रामाच्या स्मरणार्थ एक मुक्ती स्तंभ उभारण्यात आला. जो आजही औरंगाबाद येथे मोठ्या डौलाने उभा आहे.
आजचा मराठवाडा
आजचा मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक मोठा भूराजकीय प्रदेश आहे. राजकीय, शौक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात मराठवाड्याला पुरेपूर संधी मिळाली आहे. सत्तेच्या माध्यमातून मराठवाड्यात सहकार क्षेत्रही चांगलेच विस्तारले आहे. असे असले तरी मराठवाड्याला अद्याप आपला पुरेसा विकास करता आला नाही. मराठवाड्यात दुष्काळ, पाणीटंचाई, बेरोजगारी असे एक ना अनेक प्रश्न आहेत. मराठवाड्यात आर्थिक आणि सामाजिक विषमताही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. त्यामुळे येत्या काही वर्षात मराठवाड्याला सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत.