Marathi Rajbhasha Diwas: 'अमृतातेहि पैजासी जिंके' अशा शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी कौतुक केलेली मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस (Marathi Rajbhasha Din) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत राज्यात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. दरम्यान मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांना 1987 साली साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारकडून कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्याला सुरूवात केली. Marathi Rajbhasha Din 2020 Quotes: संत ज्ञानेश्वर ते कविवर्य सुरेश भट यांनी अशी मांडली मराठी भाषेची थोरवी!
हा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या विशाखा कवितासंग्रहाला मिळाला आहे. दरम्यान कुसुमाग्रजांचा जन्म दिवस हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यामागे जागतिक मराठी अकादमीनेदेखील पुढाकार घेतला आहे. मराठी भाषेचं सौंदर्य अधिक खुलवतात महाराष्ट्रातील या '14' मजेशीर बोली भाषा.
भारत देशातील प्रमुख 22 भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जाते. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 10 वी तर भारत देशातील 3 री भाषा आहे. 2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार, मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे 9 कोटींच्या आसपास आहे. महाराष्ट्र शासनासोबतच अनेक मराठी भाषा प्रेमींकडून 27 फेब्रुवारी दिवशी 'मराठी राजभाषा दिनाचं' औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच्यामाध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनाचे विविध उपाय, मोहिमा राबवल्या जातात.
जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. अशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषा बोली भाषेत,लिखाणात, श्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवण आवश्यक आहे. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातात. प्रमुख्याने 'मराठी राजभाषा दिनी' विशेष प्रयत्न केले जातात. शालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बदलत्या काळानुसार भाषेवर भौगोलिक,राजकीय, संस्कृतिक बदलाचे परिणाम होतात. मराठी भाषेवरही ते होत आहेत. त्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते.