Mangalagaur Puja Vidhi: आजपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. उद्या मंगळागौर पूजनाचा पहिला दिवस. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहीता मंगळागौर पूजतात. लग्नानंतर पहिली पाच वर्ष हे व्रत करायचे असते. नवविवाहितांसाठी खास असलेले मंगळागौरीचे व्रत करण्यासाठी यंदा 4 मंगळवार मिळत आहेत. मंगळागौरीची ही पूजा नेमकी कशी करायची? त्याचे महत्त्व काय? याविषयी जाणून घेऊया... (Mangalagaur 2021 Ukhane: मंगळागौर पूजनावेळी नाव घेण्याचा आग्रह पूर्ण करण्यासाठी विशेष मराठी उखाणे)
मंगळागौर पूजा विधी:
चौरंगावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापन करतात. शेजारी महादेवाची पिंड ठेवतात. कलश आणि दीप पूजनानंतर अन्नपूर्ण आणि पिंडीची पूजा करावी. विविध पत्री, फुले वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ इ. धान्ये मूठीने अर्पण करावीत. धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर अखंड सौभाग्यप्राप्ती आणि समृद्धीसाठी देवीची प्रार्थना करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. त्यानंतर आरती करुन पारंपारिक खेळून रात्र जागवली जाते. दुसऱ्या दिवशी अक्षता टाकून देवीचे विसर्जन करतात. लग्नानंतर पाच वर्ष मंगळागौरी साजरी केली जाते. त्यानंतर पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन करतात.
मंगळागौर पूजनावेळी नात्यातील, शेजारील, ओळखीच्या स्त्रियांना, मुलींना बोलावले जाते. हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर फुगडी, बसफुगडी, झिम्मा असे विविध पारंपारिक खेळ खेळले जातात.
पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती यांची मंगळागौरी निमित्त पूजा केली जाते. त्यांच्याप्रमाणे प्रेम नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात निर्माण व्हावे, अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. लग्नानंतर आईने मुलीला दिलेले 'सौभाग्य व्रत' म्हणून मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे.