Makar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: सुवासिनी स्त्रियांची मकर संक्रांतीची पूजा ही सुगडाशिवाय अधुरी आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडाला विशेष महत्व आहे. 'सुघट' म्हणजे शेती मालांनी भरलेला घट. त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात 'सुगड' (Sugad) असा झाला. शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी पूजले जाते. त्यानुसार सुवासिनी महिला देखील या दिवशी सकाळी स्नान करुन देवापुढे अशा सुगडाची पूजा करतात. यंदा 14 जानेवारीला या सुगडाची पूजा केली जाईल. नवविवाहित महिलांसाठी सुगडाची पूजा हे थोडं नवीनच विषय असतो. त्यामुळे अनेक महिलांना याबाबत माहितीची गरज असते. त्यामुळे तुम्हाला या सुगडाच्या पूजेबाबत जर काही माहिती नसेल वा हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.
सर्वात आधी जाणून घेऊया सुगडासाठी लागणारे साहित्य....
सुगडासाठी तुम्हाला मोठे काळे सुगड आणि त्याहून छोटे लाल सुगड लागेल. त्याबरोबरच हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे साहित्या लागेल. तसेच पूजेसाठी पाट वा चौरंग, लाल रंगाचा फडका, हळदी-कुंकू, दिवा, रांगोळी, तांदूळ, फुले, तिळगूळ-लाडू या गोष्टी लागतील.
सुगडाची पूजा कशी करावी?
1. सुगड पूजनासाठी पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडा. त्याच्या बाजूला रांगोळी काढून मधोमध स्वस्तिक काढा. त्यावर हळद कुंकू लावून पाट किंवा चौरंग मांडा.हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021: यंदा मकर संक्रांत कोणत्या दिवशी? जाणून घ्या तारीख आणि पुजेची शुभ वेळ
2. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य 2 सुगडामध्ये ठेवा. काही ठिकाणी 5 सुगडांचंदेखील पूजन केलं जातंं.
3. सुगडांवर हळदी कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळा.
4. पाट/चौरंगावर लाल वस्त्र ठेवा. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. त्यावर भरलेलं सुगडं मांडा. मोठं काळं सुगडं खाली आणि त्यावर लहान लाल सुगड मांडून ठेवा.
5. त्यानंतर दिवा लावा. सुगडावर हळद कुंकू वाहा. अक्षता फुलं वाहून नमस्कार करा.
6. तिळाचे लाडू आणि हलवे याचा नैवेद्य दाखवा.
अशा पद्धतीने सवाष्ण स्त्रिया सुगडाची पूजा करु शकतात. या दिवशी अनेक स्त्रिया घरात हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम देखील करतात. त्यावेळी सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळद-कुंकू लावून तिळगूळ लाडू आणि वाण दिले जाते. हा हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम तुम्ही रथसप्तमी पर्यंत कधीही करु शकता. मात्र सुगड हे मकर संक्रांतीच्या दिवशीच पूजायचे असते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. याद्वारा कोणतीही अंधश्रद्धा पसरवणं हा लेटेस्टली मराठी चा हेतू नाही)