![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/tilgul-784x441-380x214.jpg)
मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2020) दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. यादिवशी तीळ आणि गूळाची लाडू किंवा मिठाई बनवून वाटली जाते. यातच मकर संक्रांतीच्या तोंडावर गुळ, तीळांसह पुजेला लागणारे साहित्य महाग झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका याभागातील पानमळ्यांना बसला आहे. त्यामुळे स्थनिक भागातील किंवा इंदापूर येथून येणारी पान महाग झाली आहेत. यामुळे विड्याची पाने महाग झाली असे व्यापारी सांगत आहेत.
भारतीय संस्कृतीत महिलांकरीता मकर संक्रांत अतिशय महत्वाचा सण मानला जातो. मकर संक्रांतीच्या सणात तीळ आणि गुळाला अधिक महत्व दिले जाते. मकरसंक्रातीच्या सणात प्रत्येक घरी एकमेकांना, तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. मात्र, तिळ आणि गुळाच्या दरात वाढ झाल्याने आता तिळगुळ घ्या महाग महाग बोला अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या बाजारात तिळाचे दर 160 रुपये किलो तर, गुळाचे दर 50 रुपये आहे. गेल्या वर्षी तिळाचे दर 120 रुपये किलो तर गुळ 36 रुपये किलो होता. यावर्षी तिळात 40 रुपये प्रति किलो तर, गुळात 14 रुपयाची दरवाढ झाली आहे. याशिवाय, संक्रातीच्या पूजेसाठी सुगड्यांचा वापर केला जातो. यामधूनच वाण घेऊन सुवासिनी पूजा करत असतात. सुगडीच्या खणा बणवण्याच काम परंपरेने कुंभार समाज करतो. मात्र, आजची तरुण पिढी सुगडी खणा बनवण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे काही ठराविक लोक थोड्या प्रमाणात सुगडी बनवण्याचा व्यवसाय करतात. मागणी जास्त पुरवठा कमी यामुळे या सुगडीच्या खणाच्या भावातही गेल्यावर्षीपेक्षा 10 रुपयांनी वाढ झाली आहे. हे देखील वाचा-Makar Sankranti 2020: भोगी, मकर संक्रांती, किंक्रांत चे महत्व, पूजा विधी आणि नियम इथे घ्या जाणून!
मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे फार महत्व आहे. या दिवशी जी माणसे दान देतात त्या व्यक्तींवर सूर्यदेवाची कृपा बनून राहते, असे मानले जाते. त्यामुळे यंदा दान करून, आपल्या परिवारासोबत पतंग उडवून, तिळगुळाचे पदार्थ खाऊन हा सण आनंदाने साजरा करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांति सणाच्या खूप खूप शुभेच्छा!