Makar Sankranti 2019 : मकर संक्रांती दिवशी सुगड पूजन कसे करावे?
मकर संक्रांत सुगड पूजन (File Photo)

 Makar Sankranti 2019 : मराठी महिन्यांनुसार पौष महिन्यात येणारा पण इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत! या दिवशी सुर्याचे मकर राशीत संक्रमण होते. मकर संक्रांतीला स्त्रियांमध्ये हळदी कुंकवाची उत्सुकता असते. आपापसातील कलह, हेवेदावे विसरुन तिळगुळ देऊन नात्यातील गोडवा वाढवला जातो. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी सुगडं पूजन केले जाते. 'ही' हटके वाण देऊन साजरी करा यंदाची मकर संक्रांत !

'सुगड' हा शब्द 'सुघट' या शब्दाचा अपभ्रंश आहे. 'सुघट' म्हणजे सुघटीत असा घडा. या घड्यात शेतात बहरलेलं नवं धान्य ठेवायचं असतं. त्याची पूजा करायची असते आणि नमस्कार करुन दरवर्षी शेतं असंच फुलू दे, धनधान्यांनी बहरुन जावू दे, अशी प्रार्थना करायची असते. तर सुगड पूजन नेमके कसे करावे, जाणून घेऊया....

# पूजा  पाटावर किंवा चौरंगावर मांडायची असल्याने साधारणपणे त्या आकाराची रांगोळी काढून मधोमध स्वस्तिक काढा. त्यावर हळद कुंकू घालून पाट किंवा चौरंग मांडा. मकर संक्रांत दिवशी काळे कपडे घालण्यामागील महत्त्व!

# हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य दोन्ही सुगडामध्ये घाला.

# सुगडांवर हळदी कुंकवाची बोटे ओढून दोरा गुंडाळा.

# पाट/चौरंगावर लाल वस्त्र घाला. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. त्यावर भरलेलं सुगडं मांडा. मोठं काळं सुगडं खाली आणि त्यावर लहान लाल सुगडं.

# त्यानंतर दिवा लावा.

# सुगडावर हळद कुंकू वाहा. अक्षता फुलं वाहून नमस्कार करा.

# तिळाचे लाडू आणि हलवे याचा नैवेद्य दाखवा.

# अगरबत्ती लावून नमस्कार करा.

काही ठिकाणी पाच सुगडांची पूजा करण्याची पद्धत आहे. पाच सुगडांची पूजा देखील अशीच केली जाते. पूजा झाल्यानंतर तीन सुगडं सवाष्णींना दिली जातात. तर एक स्वत:साठी ठेवले जाते आणि एक तुळशीला वाहिले जाते. आपल्याप्रमाणे आपल्या जवळच्या मित्रमैत्रीणींचे, आप्तेष्टांचेही घर धनधान्यांनी समृद्ध व्हावे, अशी सुगडं देण्यामागे कल्पना आहे.