
महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै हा दिवस कृषी दिन (Maharashtra Krishi Din 2025) म्हणून साजरा केला जातो, जो राज्यातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचा आणि शेतीच्या योगदानाचा गौरव करतो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांनी 1963 ते 1975 या कालावधीत राज्याच्या शेती क्षेत्राला समृद्ध केले. यंदा 2025 मध्ये, महाराष्ट्र कृषी दिन 1 जुलै रोजी मंगळवारी साजरा होईल. या निमित्ताने 1 ते 7 जुलै या कालावधीत कृषी सप्ताहाचे आयोजन केले जाईल.
महाराष्ट्र कृषी दिनाची तारीख आणि पार्श्वभूमी-
वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय 1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. वसंतराव नाईक हे 1963 ते 1975 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवले. त्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आणि कृषी विद्यापीठांची स्थापना करून राज्याला शेतीत अग्रेसर बनवले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र देशातील प्रमुख कृषी उत्पादक राज्यांपैकी एक बनले आहे. म्हणूनच त्यांचा जन्मदिन, 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा होतो. कृषि दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याची अभिनव प्रथा एकनाथराव पवार यांनी पहिल्यांदा सुरू केली. आज गाव, तांडा, शहर कार्यालयाबरोबरच बांधावरही कृषी दिन साजरा केला जातो.
वसंतराव नाईक यांचे योगदान-
वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळच्या पुसद येथे झाला. त्यांना ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी शेती क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. 1972 मध्ये महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यांनी संकरित बियाणे, पाणी संवर्धन, आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन दिले. याशिवाय, त्यांनी पंचायत राज आणि रोजगार हमी योजना यासारख्या योजनांचा पाया घातला, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले. त्यांच्या कार्यकाळात अनेक कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांची स्थापना झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण मिळाले. वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण, ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक', 'शेतकऱ्यांचा जाणता राजा' म्हणूनही संबोधले जाते. (हेही वाचा: Festival In July 2025: जुलै महिन्यात कोण-कोणते सण आणि उत्सव साजरे होणार? जाणून घ्या संपूर्ण यादी)
कृषी दिनाचे महत्त्व-
महाराष्ट्र कृषी दिन हा केवळ शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर शेती क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर चर्चा करण्याचा एक व्यासपीठ आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे, आणि येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. हा दिवस शेतकऱ्यांच्या कष्टांचा गौरव करतो आणि त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवीन पिकांचे प्रकार, आणि शासकीय योजनांबाबत जागरूक करतो. या दिवशी शेतकऱ्यांच्या समस्या, जसे की कमी पाऊस, वाढती महागाई, आणि लहान जमिनीचे तुकडे, यावर चर्चा केली जाते आणि त्यावर उपाय शोधले जातात. याशिवाय, हा दिवस शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची कदर करण्यासाठी विविध पुरस्कारांचे वितरणही करतो.