Maha Shivratri 2020: यंदा 21 फेब्रुवारी रोजी साजरी होईल महाशिवरात्री; जाणून घ्या मुहूर्त, पूजाविधी व उपवासाचे महत्व
Statue of Shiva at Murudeshwar | (Photo Credits: Wikimedia)

फेब्रुवारी-मार्च महिना आला की वेध लागतात ते, महाशिवरात्रीचे (Maha Shivratri 2020). माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते, यंदा 21 फेब्रुवारी रोजी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो, शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

या दिवशी शिवाची आराधना, पूजा-अर्चना, उपवास करून महादेवाची प्रार्थना केली जाते. या दिवशी पिंडीला अभिषेक घालून, रात्रीच्या चार प्रहरी शिवाची विशेष पूजा केली जाते.  महाराष्ट्रात शंकराची 5 ज्योतिर्लिंगे आहेत, महाशिवरात्रीला या 5 देवस्थानासह राज्यभरातील अनेक ठिकाणी हा उतास मोठ्या थाटात साजरा होतो.

मुहूर्त -

21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.20 वाजता महाशिवरात्रीला सुरुवात होईल, जी दुसर्‍या दिवशी 22 फेब्रुवारी रोजी 22:00 वाजता संपेल.

रात्री महाशिवरात्रीची पूजा संध्याकाळी 6.41 ते रात्री 12.52 या वेळेत होईल. यानंतर, दुसर्‍या दिवशी मंदिरात सर्व विधींसह भगवान शिव यांची पूजा केली जाईल.

पूजाविधी -

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी नदीवर स्नान करून शिवलिंगवर रुद्राभिषेक करून विधीवत पूजा केली जाते. आसनावर बसून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करावी. महाशिवरात्रीला शिव आराधना करताना अभिषेक करण्याचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व महामृत्युंजय मंत्राचे देखील आहे.

जो मनुष्य शिवरात्रीला भगवान शंकराची पाच मंत्रांसहित गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशा पंचोपचारांनी पूजा करतो, तो पापमुक्त होतो असे सांगितले आहे. (हेही वाचा: Maha Shivratri 2019: भारतातील या ‘6’ भव्य शिवमंदिरात ‘महाशिवरात्री’चा उत्सव असतो खास)

उपवास -

या दिवशीच्या उपवसाचेही विशेष महत्व आहे, महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. जो भक्त शंकराची मनोभावे पूजा करून हा उपवास करेल, रात्रीच्या चार प्रहरी शिवाची यथासांग पूजा करेल त्याच्यावर महादेवाची सदैव कृपा राहील असे सांगितले जाते. दुसर्‍या दिवशी तीळ-खीर तसेच बेलपत्रांचे हवन करून ब्राह्मण भोजन घालावे. शंकराला अर्पण केलेला नैवेद्य खाणे वर्ज्य आहे. हा नैवेद्य खाल्ल्याने खाणार्‍याला, नरकातील दु:ख भोगावे लागते.