माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti )म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मियांच्या मान्यतांनुसार, माघी चतुर्थीचा हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे. गणेश जयंतीचा हा दिवस विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखला जातो. महाराष्ट्रात काही घरामध्ये या दिवशी दीड दिवसांसाठी भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणे गणरायाचे आगमन होते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यंदा ही माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 दिवशी आहे. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. त्यामुळे गणेशभक्तांसाठी हा महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे.
माघी गणेश जयंती कधी?
माघी गणेश जयंती यावर्षी 13 फेब्रुवारीला आहे. तिलकुंद चतुर्थी मात्र 12 फेब्रुवारी दिवशी आहे. या चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तीळाचा समावेश अधिक असतो. मोदकही तीळ आणि गूळाच्या मिश्रणाचे केले जातात. गणपती बाप्पा हा देवांचा अधिपती असल्याने कोणतेही शुभ काम सुरू करण्यापूर्वी गणरायाची पूजा करण्याची पद्धत आहे. गणेश जयंती निमित्त ऐका मन प्रसन्न करणारी 'ही' खास गाणी.
गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदुर यांनी गणेश मुर्ती बनवण्याची देखील काही ठिकाणी पद्धत आहे. या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दुसर्या दिवशी विसर्जन केले जाते. पूजा विधींमध्ये या दिवशी सकाळी स्नान करताना तीळाच्या पेस्टने मसाज करून आंघोळ केली जाते. गणेशभक्तांसाठी खास असलेल्या या दिवशी घरगुती स्वरूपात गणेश पूजन केले जाते. ज्या व्यक्ती गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा आराधना करतात त्यांना संपूर्ण वर्षभराचं गणेश चतुर्थींच्या व्रताचं फळ मिळतं अशी धारणा आहे. या व्रतामुळे घरात सुख, शांती, समृद्धी वाढते मनोकामना पूर्ण होतात अशी गणपती बाप्पाच्या भाविकांची धारणा आहे.