Laxmi Pujan 2019 Muhurat: दिपावलीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिपावलीच्या (Diwali) दिवशी सायंकाळी सर्वत्र लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) केले जाते. ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. अश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. यंदा नरक चतुर्दशीच्या (Narak Chaturdashi) संध्याकाळी म्हणजे 27 ऑक्टोबर दिवशी लक्ष्मी पूजन केले जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची बलीच्या बंदिवासातून सुटका झाली होती, अशी त्यामागची अख्यायीका आहे. लक्ष्मीच्या सुटकेमुळे या दिवशी सर्वांना आनंद झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा करुन घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावल्या जातात. तसेच लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे, यासाठी लोक लक्ष्मीमातेची मनोभावे पूजा करतात. अमावस्येला ‘लक्ष्मी’ (Laxmi) आणि ‘कुबेर’ (Kuber) या देवतांचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर, कुबेर हा संपत्ती संग्राहक असल्याचे म्हटले जाते. 'कुबेर' पैसा कसा राखावा, हे शिकवण देणारी देवता आहे. त्यामुळे या दिवशी 'लक्ष्मी' आणि 'कुबेर' देवतांची पूजा केली जाते.
हेही वाचा - Dhanteras 2019: धनतेरसच्या दिवशी भरपूर करा शॉपिंग पण 'या' गोष्टी चुकूनही घरी आणू नका
अनेक लोक जीवनात खूप पैसा मिळवतात. परंतु, तो पैसा त्यांना टिकवता येत नाही. या दिवशी ‘धने’ हा धनवाचक शब्द असल्यामुळे तर ‘लाह्या’ हे समृद्धीचे प्रतीक असल्यामुळे या पूजेत ‘धने’ व साळीच्या ‘लाह्या’ वाहिल्या जातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन केरसुणीची पूजा केली जाते. या केरसुणीने घरातील कचरा बाहेर टाकला जातो. पुराणातील एका कथेनुसार, घरात उत्साह, स्वच्छता, सौंदर्य, आनंद पाहून लक्ष्मी सर्वत्र संचार करते.
असे करा लक्ष्मीपूजन –
लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. तसेच तांब्यात श्रीफळ ठेवून त्याच्या बाजून पाच आंब्याची पाने ठेवतात. लक्ष्मीची मूर्ती पाटावर ठेवून पाटाच्या बाजूने केळीची पाने लावली जातात. तसेच घरातील सर्व सोन्याचे दागिने, पैसे, आदी सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात.
लक्ष्मीपूजन 2019 मुहूर्त –
दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.06 ते रात्री 8.37 या मुहूर्तावर पूजा करणंं फायदेशीर आहे.
व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील सर्व कुटुंब नवीन वस्त्र परिधान करतात. तसेच लक्ष्मीसह घरातील ज्येष्ठ सदस्यांचे आशिर्वाद घेऊन फटाके वाजवून आनंद साजरा करतात.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिलेला आहे, अंधश्रद्धा पसरवणे हा यामागील उद्देश नसून लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही.)