Dhanteras Puja Vidhi Muhurat in Marathi: आनंदाचा, दिव्यांचा सण अशी ओळख असणाऱ्या दिवाळीला येत्या 25 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. दरवर्षी वसुबारस या सणाने दिवाळीची नांदी होते, मात्र यंदाचे वेळापत्रक पाहिल्यास वसुबारस आणि धनत्रयोदशी हे योग एकाच दिवशी जुळून आले आहेत, त्यामुळे 25 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा (Dhanteras 2019) सोहळा पार पडणार आहे. हिंदू कालदर्शिकेनुसार, आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असते. धनाची देवता लक्ष्मी आणि धनाचे भांडार कुबेर यांची पूजा करण्याचा हा खास दिवस असतो, आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी धन्वंतरी जयंती देखील साजरी केली जाते.आयुर्वेदाचे प्रवर्तन करताना धन्वंतरी रूपात स्वतः विष्णूने अवतार घेतला होता असे मानले जाते.
चला तर मग, यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मी आणि धन्वंतरी पूजन करण्याचे महत्त्व, पुजा विधी आणि शुभ मुहूर्त काय आहे हे जाणून घेऊयात..
धन्वंतरी पूजन महत्व
उत्तम आरोग्य हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे, हेच आरोग्य सुरक्षित राहावे या इच्छेसाठी आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांची पूजा केली जाते. तसेच धन्वंतरी पूजनाच्या नंतर यमदीपदान देखील केले जाते. यामागे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी यमाकडे प्रार्थना करत घराबाहेर राईच्या तेलाचा दिवा लावण्याची परंपरा आहे.धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !
का करावी कुबेराची पूजा?
धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग या देवतांची यथासांग पूजा केली जाते. आपल्या आयुष्यात आर्थिक तुटवडा येऊ नये, कुबेराची सदैव कृपा राहावी अशी प्रार्थना यावेळी केली जाते. म्ह्णूनच यादिवशी नवीन वस्त्रे आणि अलंकार खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. घरातील सोने, चांदी, पैसा पुजून त्यांचे घरातील स्थान अबाधित राहावे या इच्छेने धनाची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी पूजेचे शुभ मुहूर्त -
शुभ मुहूर्त – संध्याकाळी 7.08 ते रात्री 8.14 पर्यंत
प्रदोष काल - संध्याकाळी 5.39 ते रात्री 8.14 पर्यंत
धनत्रयोदशी पूजा विधी
-उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करून तुपाचा दिवा लावा.
-कुबेराला पांढऱ्या रंगाची आणि धन्वंतरीसमोर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवैद्य ठेवा.
-"ॐ ह्रीं कुबेराय नमः" आणि "धनवंतरी स्तोत्र" जप करा.
-घरातील सोन्या, चांदीचे दागिने आणि नाण्यांची पूजा करा.
-घराच्या बाहेर राईच्या तेलाचा दिवा लावा.
यंदाचे धनत्रयोदशीच्या दिवशीच वसुबारस असल्याने आपल्याकडील गोधनाची आणि प्राण्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. गायीच्या पूजनाने सर्व देवतांपाशी आपली सेवा पोहचत असल्याचे मानले जाते.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिलेला आहे, अंधश्रद्धा पसरवणे हा यामागील उद्देश नसून लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही)