Laxmi Pujan 2020 Date & Significance: दिवाळी हा सणांचा राजा आहे, असे मानले जाते. पण ते अगदी खरेही आहे. दिवाळीत सगळीकडे अगदी आनंदी आणि उत्साही वातावरण असते. नवे कपडे, फटाके, गिफ्ट्स, मिठाई, फराळ यांची रेलचेल असते. रांगोळ्या, आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाई यामुळे वातावरणात एकंदर प्रफुल्लितपणा येतो. धनतेसरपासून सुरु होणारी दिवाळीची भाऊबीजेच्या दिवशी सांगता होते. साधारण 3-4 दिवस दिवाळीची धूम असते. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे 'लक्ष्मीपूजन.' काही वर्षी 'नरक चतुर्दशी' आणि 'लक्ष्मीपूजन' एकाच दिवशी येते. यंदाही हाच योग जुळून आला आहे. अश्विन कृष्ण अमावास्येला लक्ष्मी पूजन असते. त्यामुळे यंदा शनिवार, 14 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी घरोघरी लक्ष्मीची पूजा केली जाते. व्यापारी वर्गासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो.
लक्ष्मीपूजन तारीख आणि शुभ मुहुर्त:
यंदा शनिवार, 14 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. सायंकाळी 5.58 मिनिटांनंतर पूजेसाठी शुभ मुहुर्त सुरु होत आहे.
लक्ष्मीपूजन पूजा विधी:
लक्ष्मी पूजन दिवशी संपत्तीची देवता लक्ष्मी आणि पैसा कसा राखावा याची शिकवण देणारा कुबेर देवता यांची पूजा केली जाते. पाटीखाली रांगोळी काढून त्यावर हळद-कुंकू वाहावे. पाटावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा मांडा. कलश मांडावा. नारळ, पानाचा विडा ठेवावा. पैशांच्या नोटा मांडून सगळ्यावर हळद-कुंकू वाहा. अक्षता-फुलं वाहून नमस्कार करा. दिवा-अगरबत्ती ओवाळा. त्यानंतर आरती करुन लाह्या, बत्ताशे आणि पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा. पूजा संपन्न झाल्यावर हा प्रसाद सर्वांना वाटावा. आपल्याकडे झाडूला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे या दिवशी छोटा झाडू पाटाशेजारी मांडून त्याचीही पूजा केली जाते. त्याचबरोबर व्यापारी, व्यावसायिक त्यांच्या हिशोबांच्या वह्यांचे पूजन करुन या दिवसापासून नवा हिशोब मांडण्यास सुरुवात करतात.
लक्ष्मीच्या वरदहस्त आणि कुबेराचा आशीर्वाद आपल्या आपल्यावर संसारावर, कामावर कायम राहावा, यासाठी लक्ष्मी पूजन केले जाते. तसंच दिवाळीच्या या महत्त्वाच्या दिवशी घराबाहेर सुरेख रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मात्र यंदा कोविड-19 च्या संकटात दिवाळी अगदी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.