लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri)...भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाची आसामी. आज शास्त्रींचा जन्मदिन. 2 ऑक्टोबर, 1904 साली वाराणसी येथे त्यांचा जन्म झाला. भारताच्या पारतंत्र्याचा तो काळ होता, देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी जनता लढत होती. यामध्ये महात्मा गांधी अग्रस्थानी होते. शास्त्री अकरा वर्षांचे असताना गांधीजींच्या भाषणाने प्रभावित झाले व त्यांनी स्वतंत्रलढ्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. पुढे ते 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. लाला लजपतराय गेल्यानंतर ते पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर सामाजिक आणि राजकीय सुधारणा यांमध्येच त्यांनी आपले जीवन व्यतीत केले.
लाल बहादूर शास्र्ती यांची राजकीय कारकीर्दही मोठी गाजली. स्वातंत्र्यानंतर शास्र्ती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले व 1951 साली ते कॉंग्रेचे सचिव बनले. 1956 साली त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळावे व ते रेल्वे मंत्री झाले. याकाळात भारतावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा परिणाम झाला होता, त्यामुळे 1964 ला नेहरू गेल्यानंतर, लालबहादूर शास्र्ती एकमताने पंतप्रधान झाले. आज शास्र्तींच्या जन्मदिनी चला पाहूया त्यांच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी -
> शास्र्ती यांचा समानतेचा विश्वास होता व ते जातीय व्यवस्थेला सामाजिक दुष्कर्म मानत असत. यामुळेच लाल बहादूर शास्त्री यांनी अगदी लहान वयातच आपल्या आडनावाचा त्याग केला. पुढे काशी विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतरच आणि तत्त्वज्ञानाची पदवी घेतल्यानंतर त्यांना ‘शास्त्री’ ही उपाधी मिळाली. त्यांचे मूळ आडनाव वर्मा होते.
> फक्त जातीयवादच नाही तर, त्यांचा हुंड्यालाही विरोध होता. लाग्नावेळी त्यांनी आपल्या सासरकडून काहीही घेण्यास नकार दिला. खूप आग्रह केल्यावर त्यांनी फक्त काही मीटर खादीच्या कापडाचा स्वीकार केला.
> उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याआधी शास्र्ती पोलिस व परिवहन नियंत्रण मंत्री होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा महिलांना कंडक्टर म्हणून नियुक्त करून एक अर्थपूर्ण बदल घडवून आणला.
> शास्त्रींच्या मुलाला त्याच्या नोकरीवर अयोग्य पदोन्नती मिळाली. ही गोष्ट त्यांना समजताच त्यांनी ताबडतोब ती पदोन्नती रद्द करून टाकली.
> शास्त्री देशाचे पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्याकडे कार नव्हती. कुटुंबातील सदस्यांनी आग्रह केल्यानंतर शास्त्री यांनी अखेर आपल्या सेक्रेटरीला फियाट कारची किंमत जाणून घेण्यास सांगितले. कार विकत घेण्यास स्वतःचे 5 हजार कमी पडत असल्याने देशाच्या पंतप्रधानाने चक्क कर्जासाठी अर्ज केला होता. (हेही वाचा: Mahatma Gandhi 150th Birth Anniversary: महात्मा गांधीं विषयी 10 अचंबित करणा-या गोष्टी)
> परराष्ट्र व्यवहारात भारताचे भविष्य घडविण्यास लाल बहादूर शास्त्री यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘जय जवान जय किसान’ या प्रसिद्ध घोषवाक्याचा उगम त्यांच्यापासूनच झाला.
> शास्र्ती पोलिसमंत्री असताना त्यांनी लाठीचार्ज करण्याऐवजी गर्दी पांगवण्यासाठी जेटच्या पाण्याची फवारणी करण्याचा नियम लागू केला.
> 10 जानेवारी 1966 रोजी शास्त्री यांनी 1965 चे युद्ध संपवण्यासाठी, पाकिस्तानचे अध्यक्ष मुहम्मद अयूब खान यांच्याशी ताश्कंद जाहीरनाम्यावर सही केली. त्यावेळी हृदयविकाराने त्यांचा मृत्य झाला.
मृत्यनंतरही त्यांच्या जाण्याचे गूढ कायम राहिले. शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी केला होता. मृत्यनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते. मात्र पंतप्रधान कार्यालयाने याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.