
Tripurari Purnima Importance: कार्तिक मासात येणा-या पौर्णिमेच्या तिथीला 'त्रिपुरारी पौर्णिमा' (Tripurari Purnima) म्हणून संबोधले जाते. असं म्हणतात ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी (Dev Diwali) हा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी ही केवळ पाच दिवसाची असून भाऊबीजेला संपते असे सर्वसाधारण मानले जाते. पण दिवाळी ही केवळ 5 दिवसांची नसून हीच दिवाळी कार्तिक पौर्णिमेपर्यंत असते. ही कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima) का व कशासाठी साजरी करतात असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो? तसेच या पौर्णिमेचे विशेष महत्व काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या पैकी बरेच जण उत्सुक असतील.
कार्तिक मासात येणा-या या त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे-महाराजे आणि देवांना पळताभुई थोडी केली होती. त्यामुळे यज्ञ याग देखील बंद झाले होते. अखेर भगवान शंकरांना भक्तांचे हे दु:ख पाहावले नाही आणि त्यांनी अखेर त्रिपुरासूराचा वध केला.अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे, म्हणून देवांनीच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले. त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपण ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो. यंदा 12 नोव्हेंबरला देवदिवाळी साजरी केली जाते.
हेदेखील वाचा- Kartik Purnima 2018: कार्तिक पौर्णिमा दिवशी गंगा स्नान करण्याचं महत्त्व काय? कशी कराल घरी पूजा ?
देवदिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध
त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता, त्याला श्रीशंकर भगवानांनी शह दिला. त्यामुळे त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला या जाचातून मोकळा श्वास सोडला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस ‘देवदिवाळी’ म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी देवदिवाळी साजरी केली जाते.
त्रिपुरासुराचा वध हे केवळ एक निमित्त होतं, पण त्यांच्या नावामुळे देवांनाही दिवाळी काय असते, ते समजले. याचदिवशी श्रीविष्णूचा विवाहदेखील झाला होता, असा समज असल्यामुळे ही या तिथीला ‘देवदिवाळी’ असे नामाभिधान प्राप्त झाले असावे.