Kamada Ekadashi 2020: 'कामदा एकादशी' ही हिंदू नवर्षातील पहिली एकादशी आहे. आज म्हणजेच 4 एप्रिलला सर्वत्र कामदा एकादशीचे व्रत उत्साहात पार पाडले जात आहे. या दिवशी भगवान विष्णुंची पुजा केली जाते. कामदा एकादशी विष्णूंना प्रसन्न करण्याची तिथी आहे. या दिवशी कृष्णाची उपासना करून सांसारिक दोषांपासून मुक्ती मिळू शकते. हे व्रत केल्याने सर्व पाप नाहीसे होतात.
या एकादशीचा प्रारंभ 3 एप्रिलला रात्री 12 वाजून 58 मिनिटांनी सुरू होतो. तसेच 4 एप्रिलला रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी या एकादशीची समाप्ती होते. त्यानंतर द्वादशीला प्रारंभ होतो. कामदा एकादशीचे व्रत केल्याने सर्वा पापांचा नाश होतो. तसेच मोक्ष प्राप्ती होते. पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णुचे व्रत केल्याने वैकुंठ प्राप्ती होते, असंही म्हटलं जातं. (हेही वाचा - April 2020 Festival Calendar: यंदा एप्रिल महिन्यात राम नवमी, ईस्टर संडे ते अक्षय्य तृतीया सणाची धूम; पहा सण, व्रत वैकल्यांची संपूर्ण यादी)
कामदा एकादशी पुजा विधी -
सकाळी लवकर उठून प्रातःविधी आटोपून, स्वच्छ कपडे परिधान करावेत. काही वेळासाठी ध्यान करून विष्णू आणि लक्ष्मीचे नामस्मरण करावे. घरातील देवांची पूजा करून श्लोक पठण करावे. तसेच एकादशी तिथी प्रारंभापासून इच्छुकांनी उपवास ठेवायचा असतो. तांदूळ, गहू, डाळ, मसाले आणि काही वेळा तर पाणी सुद्धा या उपवासात वर्ज्य असते. काही जण साबुदाण्याची खिचडी, कुट्टू ची पुरी आणि फलाहार करून देखील उपवास ठेवतात. हा उपवास द्वादशीला म्हणजेचज दुसऱ्या दिवशी सात्विक अन्न ग्रहण करून सोडावा.
कामदा एकादशीचं महत्त्व -
शरीर आणि मनाला संतुलित ठेवण्यासाठी व्रत आणि उपासाचे नियम बनवले गेले आहे. त्यामुळे एकादशीला वैज्ञानिक महत्त्वही आहे. एकादशी महिन्यातून दोनदा येते. एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. एकादशी मुख्य रूपाने प्रभू विष्णू आणि त्यांचे अवतार यांची पूजा करण्यासाठी योग्य तिथी मानली गेली आहे. चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. हे व्रत केल्याने मन शरीर संतुलित राहतं आणि आजारांपासून मुक्ती मिळते. पाप, नाश आणि मनोकामना पूर्तीसाठी कामदा एकादशीचे विशेष महत्त्व आहे.