Ganeshotsav 2019 : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आज, म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर घरोघरी ज्येष्ठा गौरींचे (Jyeshtha Gauri) आगमन होते. गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा या गौरी आवाहन सोहळ्याचे कोकणात विशेष महत्व आहे. असं म्हणतात गौरी म्हणजेच पार्वती ही माहेरवाशिणीच्या रूपात घरी येते, यावेळी साडी, दाग दागिने घालून घरातील स्त्रिया तिला सजवतात, दुसऱ्या दिवशी या गौरीचे पूजन करतात, आणि तिसऱ्या दिवशी गौरी गणपती सह आपल्या घरी परतते. ज्येष्ठा गौरी पूजेच्या निमित्ताने ज्येष्ठ नक्षत्राला 'ओवसं' भरण्याची पद्धत कोकणासह कोल्हापूर व अन्य काही भागात प्रसिद्ध आहे. तिथीनुसार उद्या म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी घरोघरी गौरी पूजन पार पडणार आहे. चला तर मग याच निमित्ताने राज्यातील विविध भागातील ओवसं भरण्याच्या पद्धती तसेच यासाठी लागणाऱ्या वस्तू व पूजेची विधी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात..
गौरी पूजन साहित्य
गौरी पूजा व ओवसं सूप विषयी राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या चालीरीती रूढ आहेत. कोकणात एका सुपात 5 प्रकारच्या भाज्या, 5 प्रकारच्या वेलींची पाने, 5 प्रकारची फळे, करंडा फणी, ओटी (खण व नारळ) फुलं (भेंडींची असल्यास उत्तम) आणि पानावर सुटे पैसे ठेवले जातात. तसेच सूपाला हळद कुंकू लावलेले दोरे गुंडाळले जातात. तर आगरी कोळी समाजात नव्या नवरीसाठी सौभाग्यलेणी, साडी-चोळी आणि गोड पदार्थ भरलेले सूप तिच्या आईकडून पाठवण्यात येते. याशिवाय कोल्हापुरातही हा सण मोठ्या उत्साहात पार पडतो. सुपाला दोर्याच्या गुंड्या गुंडाळून, त्यात ओवश्याचं सर्व सामान ठेवतात. गौरीसहित घरामध्ये जितक्या सुवासिनी असतील, त्यासाठी प्रत्येकी पाच विडे तयार केले जातात आणि ते वाटले जातात.
गौरी पूजा विधी
सुवासिनींनी पूजेसाठी भरलेली सुपं गौरींसमोर धरली जातात त्यानंतर सुपाभोवती पाच वेळा दूध आणि पाणी सोडले जाते. यानंतर सुपात निरंजन ठेवून मग गौरींना पाच वेळा ओवाळले जाते. गौरीसोबतच शंकराला हळद कुंकू आणि तांदूळ वाहून नंतर घरच्या देवाला ओवाळले जाते.(Jyeshtha Gauri 2019: गौराईला पेशवाई नऊवारी साडी कशी नेसवाल? (Watch Video)
ओवश्याची 5 सुपं भरण्याचे कारण
एरवी घरातील स्त्रिया प्रत्येकी एक सूप घेतात. पण नवविवाहितेने पाच सुपं घेण्याची पद्धत आहे. पहिल्या वर्षी एक सूप माहेरी, एक सासरी, एक नवर्याला आणि नात्यातीलच कोणाला उरलेला ओवसा दिला जातो. हे वाण दिल्यावर ते पैसे देतात. नंतरच्या वर्षी फक्त गौरीला ओवसा दाखवला जातो.
गौरीला नैवैद्य
गौरीचे पूजन झाल्यावर साग्रसंगीताचा भोजनाचा खास नैवद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. कोकणात काही भागात यादिवशी कोंबडी वडे असा बेत केला जातो. ज्यामुळे श्रावण महिन्यात वर्ज्य केलेल्या मांसाहारी जेवणाची पुन्हा सुरुवात होते. तर तळ कोकणात गौरीला गोडाधोडाच्या पदार्थांचा नैवैद्य दाखवला जातो. कोल्हापूर, सातारा या भागात गौरीसाठी खास पुरणपोळी केली जाते . ग्रामीण भागात दिवाळीच्या फराळाच्या रूपातही नैवैद्य दिला जातो.
गौरी पूजनानंतर तिसऱ्या दिवशी सात दिवसांच्या गणपतीसह गौरीचे विसर्जन केले जाते. असं म्हणतात की, माहेराहून सासरी पुन्हा जाताना या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते.