International Students' Day 2019: आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन 17 नोव्हेंबर ला का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील इतिहास
International Students' Day (Photo Credits: File Image)

विद्यार्थी संघटना, चळवळ, आणि त्याचे पडसाद यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता मागील 80 वर्षांपासून 17 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस (International Students' Day) पाळला जातो. हा दिवस साजरा करण्याऐवजी पाळला जातो असे म्हणण्याचे कारण म्हणजे याच दिवसाशी संबंधित एक दुर्दैवी घटना देखील इतिहासात घडून गेली आहे. नाझी (Nazi)  काळात, 17 नोव्हेंबर 1939 रोजी, चेकोस्लोव्हाकिया (Czechoslovakia) वर नाझींनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी निदर्शने काढत आंदोलने पुकारली होती. या विद्यार्थ्यांवर पलटवार करताना नाझी सैन्याने नऊ जणांना जीवे मारण्यात ठोठावला तर 1200 जणांची कॉन्स्न्ट्रेशन कॅम्पमध्ये रवानगी केली. यामध्ये अनेकांना निर्दयपणे चिरडून टाकण्यात आले होते, अशातच जान ओप्लेताल या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या व अन्य हुतात्म्यांची आठवण म्हणून हा दिवस जगभर पाळला जातो.

या घटनेनंतर चेकोस्लोव्हाकिया स्वतंत्र झाल्याने 1939 च्या उत्तरार्धात चार्ल्स विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून या दिवशी काही सांस्कृतिक प्रात्यक्षिके करून साजरा केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या नावाने हा दिवस पहिल्यांदा 1941 साली इंटरनॅशनल स्टुडंट कौन्सिलतर्फे लंडनमध्ये साजरा करण्यात आला होता. कालांतराने इंटरनॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्स आणि युरोपीयन नॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्स या संघटनांनीदेखील हा दिवस पाळण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या घटनेच्या नंतरही याच दिवशी काही महत्वाच्या घटना देखील योगायोगाने घडत गेल्या. यामध्ये ग्रीसमधील अथेन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी 1973 साली तिथल्या लष्करी राजवटीविरोधात पुकारलेले बंड, 1989 च्या सुवर्णमहोत्सवी वषीर् सोशालिस्ट युनियन ऑफ यूथ या संघटने तर्फे कम्युनिस्ट झेक सरकारविरुद्ध छेडलेले आंदोलन या घटनांचा समावेश आहे. तसेच बलिर्नची भिंत पाडल्यानंतरही इंटरनॅशनल युनियन ऑफ स्टुडंट तर्फे या दिवशी आनंद साजरा करण्यात आला होता. नोव्हेंबर 2004 मध्ये मुंबईत वर्ल्ड सोशल फोरम मध्ये जगभरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हक्कांविषयी कार्यक्रम केला होता.

यंदाही हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळला जातो. या दिवशी सामाजिक उपक्रम राबवून या लढ्यांमधून बलिदान दिलेल्या विद्यार्थ्यांचे स्मरण केले जाते. एकाअर्थी हा दिवस हुतात्मा आदरांजली दिन म्ह्णून पाळला जातो.