हरिद्वार हे एक पवित्र आणि धार्मिक स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक गंगेत स्नान करण्यासाठी आणि मनसा देवीच्या दर्शनासाठी इथे येतात. परंतु या पवित्र स्थानापासून थोड्याच अंतरावर, एक खास मंदिर आहे जे ‘भारत माता मंदिर’ (Mother India Temple) म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे उद्घाटन 1983 मध्ये झाले व त्यानंतर लोक येथे दर्शनासाठी येऊ लागले. आज हे एक प्रमुख धार्मिक स्थळ बनले आहे. या मंदिराशी अनेक पौराणिक कथाही जोडलेल्या आहेत. हे मंदिर तब्बल आठ मजली उंच आहे. हे भारतामधील एकमेव भारत माता मंदिर आहे.
हरिद्वारचे भारत माता मंदिर हे धार्मिक श्रद्धा आणि देशभक्तीच्या मिश्रणाचे अनोखे उदाहरण आहे. देशातील हे असे एकमेव मंदिर आहे जिथे देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद आणि देशभक्तांची पूजा केली जाते. येथे कोणताही विधी होत नाहोत. मंदिरात सर्वत्र देवतांसह संत-महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिक दिसतात. मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, मग तो कोणत्याची जातीचा किंवा धर्माचा असेल.
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते 1983 मध्ये या मंदिराचे उद्घाटन करण्यात आल्याचे सांगितले जाते. या मंदिराची उंची सुमारे 180 फूट असून प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट आहे. यातील पहिला मजला भारत मातेला समर्पित आहे. या ठिकाणी भारतमातेची मूर्ती आणि मोठा नकाशा बसवण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्याला ‘शूर मंझिल’ म्हणतात, जिथे झाशीची राणी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी इत्यादींच्या मूर्ती बसवल्या आहेत.
तिसर्या मजल्याला मातृ मंदिर म्हणतात, तिथे मीराबाई, सावित्री आणि काही महान महिलांच्या मूर्ती आहेत. चौथ्या मजल्याला ‘संत मंदिर’ म्हणतात. या मजल्यावर कबीरदास, गौतम बुद्ध, तुलसीदास आणि श्री साईबाबा यांसारख्या संत-महापुरुषांच्या मूर्ती आहेत. पाचव्या मजल्यावर अनेक देवांची तसेच महापुरुषांची चित्रे आहेत. (हेही वाचा: Independence Day 2023 Date: यंदा 15 ऑगस्ट दिवशी भारत 76 की 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार)
सहावा मजला शक्तीला समर्पित आहे. या ठिकाणी देवी सरस्वती, देवी दुर्गा, देवी पार्वती इत्यादींची येथे पूजा केली जाते. सातवा मजला भगवान विष्णूला समर्पित आहे. या मजल्यावर भगवान विष्णूच्या दहा अवतारांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. आठव्या आणि शेवटच्या मजल्यावर शिवाचे मंदिर आहे, तिथे हिमालय पर्वतावर बसलेली एक मूर्ती आहे. दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेत भारत माता मंदिराला भेट देऊ शकता. या मंदिराला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.