Hanuman Jayanti 2024 Date: दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2024) हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. वानर गणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांचा हनुमान हा पुत्र आहे अशी हिंदू धर्मातील प्रचलित धारणा आहे. कॅलेंडरनुसार, यावर्षी हनुमान जयंती 23 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून भगवान श्रीराम, माता सीता आणि हनुमानजींचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते. हनुमान जयंतीनिमित्त उपवास करणाऱ्यांना दिवसभर ब्रह्मचर्य पाळावे लागेल.
हा दिवस शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी हनुमानाची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यासोबतच कुंडलीतील मंगळाची स्थितीही मजबूत होते.
हनुमान जयंती तिथी-
चैत्र महिन्यात येणारी हनुमान जयंती शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. पंचांगानुसार, ही तिथी 23 एप्रिल रोजी पहाटे 3:25 वाजता सुरू होईल आणि 24 एप्रिल रोजी पहाटे 5:18 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाईल. यावर्षी हनुमान जयंती खूप खास आणि शुभ असणार आहे, कारण यावेळी हनुमान जयंती मंगळवारी येत आहे आणि हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे. (हेही वाचा: Birthplace of Lord Hanuman: तिरुमाला तिरुपति देवस्थानमकडून भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाची घोषणा; अंजनाद्री टेकड्यांवरच अंजनीपुत्राचा जन्म झाल्याचा दावा)
पूजेचा मुहूर्त-
23 एप्रिल रोजी सकाळी 9.03 ते 10.41 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त- 23 एप्रिल पहाटे 4.20 ते 5.04 पर्यंत
हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता, म्हणून या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून हनुमानाची पूजा केली जाते. तसेच शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत, मंत्रजप केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासांपासून मुक्ती मिळते असेही मानतात. हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर हनुमान जयंतीला सुंदरकांड, हनुमान चालीसा, हनुमान अष्टक आणि बजरंग बाण अवश्य पाठ करा.
(टीप- या लेखात दिलेली माहिती गृहीतके, ज्योतिष शास्त्र आणि इंटरनेट आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली आहे. लेटेस्टली मराठी या गोष्टींना दुजोरा देत नाही)