हिंदू धर्मानुसार हनुमान (Lord Hanuman) हे शक्तीचे प्रतीक मानलं जातं. शंकराचा (lord Shankar) अकरावा रुद्र अवतार म्हणून ओळखल्या जाणारा हनुमान हा बळाचा अधिपती म्हणून प्रसिद्ध असला तरी ज्या भावाने हनुमंताची पूजा केली जाते त्या रूपात त्याची प्रचिती येते असेही म्हंटले जाते.सतराव्या शतकात समर्थ रामदासांनी (Ramdas swami) हनुमानाच्या पूजेच्या निम्मिताने लोकांमध्ये बलोपासनेची बीजं रुजावीत या हेतूने महाराष्ट्रातील अकरा गावांमध्ये हनुमानाच्या मंदीरांची स्थापना केली
सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात स्थित या मंदिरांना भेट देण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी पुरेसा ठरतो. ग्रामीण भागातील वाहतुकीच्या प्रगतीमुळे हा प्रवास अलीकडे अधिक सोयीस्कर झाला आहे.
समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या अंभगात ह्या अकरा मारुतींबद्दल उल्लेख आहे :-
'चाफळामाजीं दोन, उंब्रजेसी येक । पारगांवीं देख चौथा तो हा ॥ पांचवा मसूरी, शहापुरीं सहावा। जाण तो सातवा शिराळ्यांत॥ सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा। दहावा जाणावा माजगांवीं॥ बह्यांत अकरावा, येणें रीतीं गांवा। सर्व मनोरथा पुरवील॥ वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥'Hanuman Jayanti 2019: भारतातील विविध राज्यात 'हनुमान जयंती' च्या तारखांमध्ये तफावत! पाहा कधी कुठे साजरी केली जाते हनुमान जयंती
१९एप्रिलला येऊ घातलेल्या हनुमान जयंतीचे औचित्य साधून या मंदिरांना भेट देण्याचा विचार करत असाल तर या अकरा ठिकाणांना आवर्जून भेट द्या..
1)चाफळचा वीर मारुती
सातारा- कराड मार्गावरील उंब्रज या गावापासून जवळपास 11 किमी अंतरावर स्थित चाफळ या गावी, समर्थ रामदासांनी, इ.स. 1648मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची स्थापना केली. इ.स.1649 मध्ये याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीच्या मूर्तीची उभारणी करण्यात आली.दगडी मंदिरात श्रीरामाच्या समोर नम्रभावे उभ्या असेल्या हनुमाच्या मूर्तीची उंची सहा फूट इतकी आहे.
2)प्रताप मारुती
चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे अंदाजे 100 मीटर अंतरावर प्रताप मारुतीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. मंदिरात असलेली मारुतीची सात ते आठ फूट उंचीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये केलेल्या 'पुच्छ ते मुरडिले माथा' या वर्णनांच प्रत्यक्ष स्वरूप आहे. या मूर्तीच्या कमरेला सोन्याची कासोटी सोबत किणकिणणाऱ्या घंटा असून नेटक्या सडपातळ शरीरयष्टीच्या हनुमानाच्या डोळ्यातून जणू अग्नीवर्षांव होतो असा भास होतो. अशा रौद्र मुद्रेतील मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे.
3)माजगावचा मारुती
चाफळपासून साधारण तीन किमी अंतरावर असलेल्या माजगाव किंवा माजलगावात समर्थानी या हनुमान मंदिराची स्थापना केली आहे. गावाच्या सीमेवर असलेल्या घोड्याच्या आकारातील गावरक्षक दगडावर मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे. अंदाजे 100 चौरस फूट लांबी-रुंदीच्या, कौलारू, माती-विटांचे मूळ मंदिरातील भिंतीवर हातात द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे.
4)शिंगणवाडीचा बाल मारुती
चाफळपासून अवघ्या एक किमी अंतरावर असलेल्या शिंगणवाडी या टेकडीवर 1650 मध्ये या मंदिराची बांधणी करण्यात आली. सहा फूट लांबी-रुंदी असलेले हे मंदिर 11 मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. टेकडीवर उंच ठिकाणी असलेल्या या मंदिराचा तांबडय़ा रंगाने रंगवलेला कळस लांबूनच दृष्टीस पडतो. जेमतेम चार फूट उंचीच्या उत्तरमुखी हनुमाच्या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू असून उजवा हात उगारलेला आहे. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थाची भेट झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
5)मठातील मारुती
उंब्रज गावच्या मठातील मारुती हा जागेशी जोडलेल्या आख्यायिकांमुळे प्रसिद्ध आहे. इ.स. 1650 साली समर्थानी या गावात चुना, वाळू आणि ताग हे पदार्थ वापरून अंदाजे दोन फूट उंच अशी मूर्ती साकारली होती. या मठाजवळील नदीच्या काठच्या दगडावर हनुमानाच्या पावलांचा ठसा उमटल्याचे यापूर्वी सांगितले जायचे मात्र आत हा दगड वाळूत पुरला गेला आहे.
6)मसूर गावचा हनुमंत
उंब्रज पासून दहा किमी अंतरावर असलेल्या मसूर गावी स्थापित पाच फूट उंचीची, चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुख असलेली ही मारुतीची मूर्ती खरे तर सर्व 11 मारुतींमध्ये देखणी म्हणायला हवी.इ.स. 1646 साली याची स्थापना समर्थानी केली. सौम्य आणि प्रसन्न मुद्रा असलेल्या हनुमंताच्या मस्तकी मुकुट, गळ्यात माळा, जानवे, कमरेला मेखला असा सगळा थाट आहे. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो.
7) शिराळयाचा उत्तराभिमुख हनुमान
सांगली जिल्ह्यात सर्वाधिक नागांची संख्या असणाऱ्या शिराळे या गावी एस टी स्टॅन्ड जवळच हे मारुतीचे उत्तराभिमुख मंदिर बांधण्यात आले आहे.1655 साली समर्थानी सात फूट उंचीची चुन्यात बनवलेली हनुमंताची मूर्ती या मंदिरात स्थापित केली. कंबरपट्टयाल जोडलेल्या घंटा शिवाय कटिवस्त्र आणि त्याचा गोंडा या मूर्तीची शोभा वाढवतो. मूर्तीच्या उजव्या बाजूला कवडसा येत असल्याने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हनुमानाच्या मुखावरील तेज आणखीनच खुलून येते.
8)चुन्याचा मारुती
कराड- मसूर रस्त्यावरन 15 किमी अंतरावर असलेल्या शहापूर गावात समर्थानी 1645 साली 11 मारुतींपैकी सर्वात पहिल्या मंदिराची स्थापन केल्याचे मानले जाते. मंदिरातली सात फूट उंच मूर्ती चुन्याचा मारुती या नावाने प्रसिद्ध आहे.शहापूर गावाच्या एका टोकावर वसलेले हे मंदिर आणि त्यातील मूर्ती पूर्वभिमुख स्वरूपात आहे. चेहऱ्यावर उग्र भाव असलेल्या मूर्तीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे.
9)पूर अडवणारा मारुती
सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यातील बाहे बोरगाव या ठिकाणी इ.स. 1652 मध्ये समर्थानी या मंदिराचा पाया रचला. प्राचीन काली असलेल्या राममंदिराच्या समोर असलेलं शिवलिंग व पाठीमागे पाणी अडविण्यासाठी दोन्ही हात मांडीजवळ धरलेल्या हनुमानाची मूर्ती या मंदिराची खासियत आहे.
कृष्णेला आलेला पूर थांबवण्याकरिता मारुतीरायाने नदीपात्रात मधोमध बसून आपले दोन बाहू आडवे धरून तो प्रवाह आपल्या दोन्ही बाजूंनी प्रवाहित केला त्यामुळे मध्ये एक बेट तयार झाले. हनुमंताने दोन बाहूंनी नदीचा प्रवाह विभागला गेला म्हणून बहे असे नाव या ठिकाणाला प्राप्त झाले, असे मानले जाते.
10)मनपाडळेचे कौलारू मंदिर
दक्खनचा दरवाजा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पन्हाळगड परिसरात मनपाडळे या गावी अंदाजे इ.स.1652मध्ये समर्थानी हनुमान मंदिराच्या रूपातील शक्तिकेंद्राची स्थापना केली. अंदाजे पाच फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीची मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी ठेवलेली दिसते. आसपास झाडी असलेल्या, ओढय़ाकाठी सात फूट औरसचोरास गाभाऱ्याचे एक सुंदर कौलारू मंदिर निसर्गरम्यतेचि साक्ष पटवून देतात.
11)पारगावचा इवलासा मारुती
कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा साखर कारखान्याच्या रस्त्यावर असलेल्या पारगाव या छोटेखानी गावात समर्थानी 1653 मध्ये मारुतीचे मंदिर उभारले. बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती अशी ओळख असणाऱ्या मूर्तीला 11मारुतींपैकी सर्वात शेवटी स्थापलेली आणि सर्वात लहान मूर्ती मानले जाते. सपाट दगडावर कोरलेल्या जेमतेम दीड फूट उंच मारुतीच्या केसाची शेंडी बांधलेली दिसते. मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याच्या आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे..