रावणाच्या (Ravan) लंकेत धुमाकूळ घालून सीतेला (Seeta) सोडवून आणणारा हनुमंत (Lord Hanuman) म्हणजे रामायणाच्या (Ramayan) कथा ऐकून मोठे झालेल्या सर्वांसाठी कोण्या सुपरहिरो पेक्षा कमी नाही. मारुतीरायाने बालपणापासूनच आपल्या लीला दाखवून सगळ्यांना थक्क करून सोडलं होतं. भूक लागली म्हणून केळ्याची बाग फस्त करणारा बालमारुती, स्वतःची छाती फाडून रामाची (Lord Ram) प्रतिमा दाखवणारा रामभक्त, लक्ष्मणाच्या (Laxman) उपचारासाठी द्रोणागिरी उचलून आणणारा पवनपुत्र अशा एक ना अनेक प्रासंगिक नावांनी जगभरात प्रसिद्ध आहे.
आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय अशा या हनुमानाचा जन्म महोत्सव 19 एप्रिलला देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. वानर केसरी याची पत्नी अंजनीने महादेव शंकराला केलेल्या तब्बल 12 वर्षांच्या तपस्येनंतर चैत्र पौर्णिमेला पुत्र प्राप्ती झाली हा अंजनीचा सूत म्हणजेच हनुमान.Happy Hanuman Jayanti 2019: 'हनुमान जयंती'च्या शुभेच्छा देण्यासाठी खास '5' मराठी शुभेच्छापत्रं!
हनुमान जयंतीच्या निम्मिताने आपल्या लाडक्या बजरंगबली बद्दल सात मजेशीर गोष्टी जाणून घ्या...
1) का म्हणतात पवनपुत्र?
हनुमानाचे आई वडील म्हणजे अंजनी आणि केसरी नामक वानर हे असले तरी अनेकदा त्याला पवनपुत्र म्हणूनच संबोधलं जात. यामागे एक पौराणिक कथा आहे, ती अशी की, हनुमानाची आई अंजनी ही खरतर एक शापित अप्सरा होती, तिला पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला गेला होता. एकीकडे ही अंजनी संतान प्राप्तीसाठी शंकराची तपस्या करत असताना दुसरीकडे राजा दशरथाने देखील पुत्र प्राप्तीच्या हेतूने पुत्र कामेष्ठी यज्ञाचे आयोजन केले होते.या यज्ञाने प्रसन्न होऊन अग्नी देवतेने दशरथाला पायसदान देऊ करताच त्याच वेळी यातील काही पायस हे वाऱ्याने उडून अंजनी ज्या ठिकाणी तपस्या करत होती तिथे पोहचले होते.
या पायसाच्या सेवनाने अंजनीला हनुमानरूपी पुत्राची प्राप्ती झाली होती.हे पायस वाऱ्यामुळे उडून आल्याने हनुमानाला पवनपुत्र अशी ओळख मिळाली.
2)भीम आणि हनुमान आहेत सख्खी भावंडं?
महाभारतात कुंती पुत्रांना प्रत्येकी एका देवाच्या नावाशी जोडलं गेलं होतं, त्यानुसार भीमाचे वडील हे वायू देवता असल्याचे मानले जाते. त्यामुळे रामायणात पवनपुत्र अशी ओळख असलेला हनुमंत हा भीमाचा सख्खा भाऊ असल्याचं पुराणात मांडलं आहे. या दोन्ही भावंडांमधील प्रचंड बाहुबळ या शक्यतेची सार्थता पटवून देतं.
3)हनुमान सूर्याला समजायचा आम्रफ़ळ
हनुमंत हा शरीराने जरी महारौद्र किंवा बलाढ्य असला तरी स्वभावाने भोळा होता. बाल हनुमानाला सूर्य हा आंब्याचं फळ आहे अशी समजूत होती त्यामुळे एकदा भूक लागली असताना सूर्याला खाण्यासाठी त्याने आकाशात झेप घेतली होती.
4)रामाला केले होते पराभूत
रामावर निस्सीम श्रद्धा असूनही पौराणिक कथांमध्ये हनुमानाने रामाला युद्धात पराभूत केल्याचा उल्लेख आहे. ययाती विरुद्ध युद्धात विश्वामित्र ऋषींनी ययातीला मारण्याचे आदेश रामाला दिले होते. याच वेळी ययातीने हनुमाना जवळ आश्रयाची याचना केली होती. हनुमानाने ययातीला काहीही होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्यावर युद्धाच्या वेळी रामाला पराभूत करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली होती. युद्धाच्या वेळी प्रभुरामाच्या नावाचा जप करून हनुमानाने त्यांना प्रसन्न करून घेतले आणि त्याची भक्ती पाहून रामाचे बाण वाया जाऊ लागले. त्यानंतर विश्वामित्रांनी देखील आपले आदेश मागे घेतले.
5)हनुमाच्या प्रचंड भूकेवर रामाचा उपाय
हनुमानाला खाण्याची खूप आवड होती आणि त्यासोबतच त्याची भूक देखील जास्त असल्याने एकदा सीतेने त्याच्यासाठी विविध पदार्थांची मेजवानी बनवली होती. हनुमानाने ते सगळे पदार्थ खाऊन फस्त केल्यावरही त्याची भूक काही क्षमत नव्हती तेव्हा प्रभू रामाने त्याला एक तुळशीचे पान खायला दिले आणि त्यानंतर हनुमानाची भूक शांत झाली. असा प्रसंग काही प्राचीन कथांमधून पाहायला मिळतो.
6)हनुमानाचा पुत्र
नैष्ठिकी (अनंत) ब्रह्मचारी हनुमानाला देखील अपघाताने पुत्र प्राप्ती झाली होती ह्याचे दाखले पुराणात दिलेले आहेत. लंका दहनानंतर आपल्या शेपूटाला लागलेली आग विझवण्याकरिता हनुमंताने समुदारात उडी घेतली आणि त्याच वेळी त्याच्या घामाचा एक थेंब मकर, या समुद्री जीवाच्या मुखात पडला. त्यापासूनच मकरध्वज या हनुमान पुत्राचा जन्म झाल्याचं सांगण्यात येतं.
7) हनुमान अजूनही जिवंत आहे?
काही ग्रंथांनुसार हनुमानाला अमरत्वाचे वरदान प्राप्त आहे त्यामुळे तो चिरंजीव असून अद्यापही जिवंत आहे असे मानले जाते. जो पर्यंत प्रभू रामाचं नाव आपल्याकडून घेतलं जाईल तोपर्यंत त्याचा परमभक्त हनुमान हा जिवंत असेल अशी यामागील भावना आहे. हनुमानाचं अस्तित्व हे त्रेता युग, द्वारपा युग आणि काली युग या तिन्ही युगांमध्ये पाहायला मिळत असल्याने हनुमान सर्वाधिक काळ आयुष्य प्राप्त झालेलं प्राचीन उदाहरण आहे.
मारुतीरायाला प्रसन्न करून आत्मबळ प्राप्त होत असल्याची भक्तांची भावना असल्याने हनुमान जयंतीचा उतरावं आज जगभरातील हनुमान भक्तांमध्ये उत्साहाने साजरा केला जात आहे.