Gatari Amavasya 2019: मद्यपींच्या अतिरेकामुळे गटारी अमावस्या बदनाम, अनेकांना वाटतं मांस-मदिरा प्राशनाचा परवानाच मिळाला; जाणून घ्या गटारी की गतहारी अमावस्या?
Gatari Amavasya 2019 | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Gatari Amavasya 2019: भारतीय संस्कृती आणि हिंदू पंचांगात अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे स्थान असलेला महिना म्हणजे श्रावण. या महिन्यात उपवास, वृतवैकल्य आणि पूजा-अर्चा यांचा भडीमार असतो. पण, श्रावण महिना सुरु होत असल्याची खरी ओळख पटते ती गटारी अमावस्या साजरी केल्यानंतरच. गटारी अमावस्या हे नाव जरी उच्चारले तरी, अनेकांचे कान ताबडतोब टवकारतात. श्रावणमासारंभाच्या एक दिवस आगोदर गटारी अमावस्या येते. म्हणजेच गटारी अमावस्या संपली की लगेच श्रावन महिना सुरु होतो. पण अलिकडील काही वर्षांत गटारी अमावस्या भलतीच बदनाम झाली आहे. व्यसनांचा अतिरेक हे या बदनामीचे कारण आहे. अनेकांना तर असे वाटते की, गटारी अमावस्या म्हणजे त्या दिवशी आपणाच मांस, मद्य भरपूर प्रमाणात प्राशन करण्याचा परवानाच मिळाला.

गटारी की गतहारी?

काही लोक सांगतात की गटारी अमावस्या वैगेरे असा काही शब्द नाही. तर, मुळात तो गतहारी अमावस्या असा शब्द आहे. पण, दोन्ही शब्दांबद्दल विशेष अशी ठोस माहिती मिळत नाही. सध्या तरी लोकचर्चेत आणि नागरिकांच्या दैनंदिन घडामोडींची नोंद ठेवणाऱ्या दिनदर्शिकेत अनेक पंचांगकर्ते गटारी अमावस्या असाच शब्द वापरतात.

गटारीला दिव्यांची पूजा

काही लोक सांगतात की, गटारी अमावस्या ही दिव्यांनी आणि गोडधोड नैवद्यांनी बनवून साजरी केली जाते. गटारी अमावस्येदिवशी घरातील सर्व दिवे, कंदील, निरंजन, समया प्रकाश देणाऱ्या किंवा प्रकाशासाठी साधण ठरणाऱ्या सर्व वस्तू घासूनपूसून स्वच्छ केल्या जातात. त्या दिवशी गूळ घालून उकडलेल्या कणकेचे दिवे तयार करतात, तसेच, पूरण घातलेले धिंडे आदींचा गोडधोड नैव्यद्य बनवला जातो. घसूनपूसून स्वच्छ केलेल्या दिव्यांची पूजा केली जाते. तसेच, कणकेच्या दिव्यात तूपाची वात लावली जाते. हा दिवा देवापुढे ठेवला जातो. अर्थात, या बाबत शास्त्रात ठोस माहिती मिळतेच असे नाही. (हेही वाचा,  Deep Amavasya 2019: दीप अमावस्या का आणि कशी साजरी करतात?)

मद्यपींमुळे गटारी अमावस्या बदनाम

दरम्यान, काही लोकांनी गटारी अमावस्येचा भलताच अर्थ लावला आहे. या लोकांना वाटते की गटारी अमावस्या म्हणजे प्रचंड दारु आणि मांस सेवन करण्याचा दिवस. या दिवशी भरपूर दारु प्यायची, मांस सेवन करायचे आणि नशेत तर्र व्हायचे असाच काहीसा या मंडळींचा विचार असतो. पण, प्रत्यक्षात गटारी अमावस्ये दिवशी दारु, मद्य प्यायलाच हवे असे मुळीच नाही. त्या दिवशी दारुचा थेंब अथवा मांसाचा तुकडाही नाही खाल्ला तरी चालतो. त्या दिवशी तुमचा कडकडीत उपवास असला तरीही काही फरक पडत नाही. परंतू, व्यसन करणाऱ्या लोकांना या दिवसाचे भलतेच महत्त्वा वाटते. काही महाभाग तर या दिवशी कामाला आणि ऑफिसला चक्क दांडी मारतात. आपले दैनंदिन काम करण्यापेक्षा नशेत तर्र राहण्यात या मंडळींना आनंद वाटतो. अशा लोकांमुळेच गटारी अमावस्या कारणाशिवाय बदनाम झाल्याचाही आरोप होतो. अर्थात, खास करुन त्या दिवशी (गटारी अमावस्या) मांस आणि मद्य सेवन केल्याने तो दिवस बदनाम होतोच का यावर चर्चा होऊ शकते.

सोशल मीडियावर शुभेच्छांचे फुटले पेव

सोशल मीडिया हा आजच्या काळात अनेकांना मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे असे वाटते. तर, काहीजण त्याचा शस्त्रासारखा वापर करतात. काही मंडळी मात्र शुभेच्छा देण्यासाठी याचा वापर करतात. दिवस कोणताही असो ही मंडळी शुभेच्छा देणारच. अगदीच काही नसेल तर गुड मॉर्निंग आणि गुड नाईट तरी हे मंडळी म्हणतातच. अशा मंडळींसाठी गटारी अमावस्या हासुद्धा महत्त्वाचा दिवस ठरतो. त्यामुळे हे लोक सोशल मीडियावर गटारी अमावस्येच्या शुभेच्छा देतात. अर्थात, आलिकडे मुख्य प्रवाहातील काही प्रसारमाध्यमं आणि डीजिटल क्रांतीतून जन्माला आलेली वेब पोर्टल्सही शुभेच्छूक लोकांना मदत करतात. त्यासाठी व्हाट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर देता येतील अशा शुभेच्छा, कोट्स वैगेरे प्रसिद्ध केले जाते. (हेही वाचा, Gatari Amavasya 2019 Messages: श्रावण पाळणार्‍या नॉनव्हेज प्रेमींना WhatsApp Status, Facebook Messenger च्या माध्यमातून गटारीच्या शुभेच्छा देण्यासाठी मजेशीर मेसेजेस आणि ग्रिटिंस)

प्रथेला धार्मिकतेची जोड?

दरम्यान, वरील सर्व मुद्द्यांवर चर्चा होत असली तरी गटारी अमावस्या का साजरी केली जात असावी हा प्रश्न उरतोच. या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही जाणकार सांगतात की, श्रावण महिना म्हणजे पावसाचा महिना. या महिन्यात पावसाच्या सरी कोसळत असतात. अर्थात ऋतूबदल होत असल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा परिणाम विचारात घेऊन काही बंधने पाळण्याची प्रथा सुरु झाली असावी. या प्रथेलाच धार्मिकतेची जोड देण्यात आली असावी. या महिन्यात उपवास आणि वृतवैकल्य केली जातात. त्यामुळे पुढील एक महिना आपल्या आहारावर आणि खाण्यापिण्यावर मर्यादा येणार हे गृहित धरुन एक दिवस आनंदाने साजरा केला जात असावा. या आनंदाच्या दिवसाला गटारी हे नाव काही कारणाने पडले असावे. पण, अलिकडील काही वर्षांत हा दिवस साजरा करताना अतिरेक झाल्याने हा दिवस कारणाशिवाय बदनाम झाल्याचीही चर्चा होते.