![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-02T121539.738-380x214.jpg)
Ancient Ganesha Temples In India: आजपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह देश भरात इतकंच नव्हे तर विदेशातही मोठी धामधूम सुरु आहे. आज, 2 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून ते 12 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी पर्यंत लाडके बाप्पा आपल्या भक्तांसोबत राहणार आहेत. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मुंबापुरीत एक वेगळाच जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतो. गल्लोगल्ली स्थित मंडळं, प्रत्येक मंडळाची आकर्षक उंच गणेशमूर्ती, हजारो भक्तांच्या रांगा आणि आकर्षक देखावे यामुळे मुंबईला जणू काही वेगळी ओळखच मिळते. हा नयनरम्य सोहळा बघायला दरवर्षी लाखो पर्यटक मुंबईत येतात. पण यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून तुम्हाला भारताच्या विविध राज्यातील प्राचीन गणेश मंदिरे, त्यांचे उत्सव व इतिहास याविषयी जाणून घ्यायला आवडेल का? यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय या प्रसिद्ध मंदिरांची सफर तुमच्या बोटाच्या क्लिकवर..(Ganesh Chaturthi 2019: गणपतीची लांब सोंड, मोठ पोट, बारीक डोळे असं गणेशाचं रूप जाणून घ्या नेमकं कशाचं प्रतिक आहे? या आहे त्यामागील अध्यात्मिक संकेत)
चला तर मग..
कनीपकम मंदिर, आंध्रप्रदेश
आंध्रप्रदेशातील चित्तोड जिल्ह्यात स्थित तिरुपती पासून 75 किमी दूर वसलेलं 'कनीपकम' हे प्राचीन गणेश मंदिर त्याच्या ऐतिहासिक वास्तू व आकर्षक बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. कपाळावर पांढरा, लाल व पिवळा रंग असलेल्या या बाप्पाच्या दर्शनासाठी देशातील विविध भागातून भाविक वर्षभर गर्दी करतात. या मंदिराचं बांधकाम अकराव्या शतकात चोला साम्राज्याच्या 'कुलोथींग्स चोला पहिला' या राजाच्या कारकिर्दीत झाले आहे. विनायक चतुर्थीच्या निमित्तानं साजरा होणारा ब्राह्मोत्सवम हा सोहळा वर्षभरातील प्रमुख मानला जातो.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-02T121803.054.jpg)
मणकुळा विनायक मंदिर, पॉंडीचेरी
पॉंडीचेरी येथील मणकुळा विनायक मंदिर जवळपास 1666 वर्षांपूर्वी फ्रेंच वसाहतीच्या काळात बांधण्यात आले. मंदिरातील एका लहान तलावावरून(कुलम) या मंदिरास मणकुळा हे नाव देण्यात आले. मंदिराजवळ असणाऱ्या किनाऱ्यावरील वाळू वाहत येऊन या तलावाजवळ साचते. अनेकदा समुद्रात टाकून दिल्यानंतरही या मंदिरातील गणेश मूर्ती दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर म्हणजे वसाहतींच्या मध्य भागी पुन्हा प्रकट होतं असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येतं. ब्राह्महोत्सव व गणेश चतुर्थी हे येथील मुख्य सण आहेत. मंदिरामध्ये एक हत्ती असून भाविकांनी त्याच्या सोंडेने आशीर्वाद घेणं हा या मंदिराच्या भेटीतील मुख्य अनुभव असतो.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-02T122236.420.jpg)
मधुर महागणपती मंदिर, केरळ
मधुवाहिनी नदीच्या तटावर स्थित मधुर महागणपती मंदिर हे दहाव्या शतकात बांधण्यात आले आहे. कुंबळ साम्राज्याच्या मैपदी राजस याने ही बांधणी केली आहे. येथील मूळ दैवत हे भगवान शंकर आहेत.मात्र विविध धातूंपासून बनलेली गणेशाची मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. कधीकाळी टिपू सुलतान हे मंदिर नष्ट करण्यासाठी केरळ मध्ये आला होता मात्र मंदिरात जाताच त्याचा विचार बदलून सुलतान मागे परतल्याची आख्यायिका आहे. याशिवाय मंदिरात तलाव असून या पाण्यात औषधी गुण आहेत ज्याने त्वचा रोग किंवा दुर्धर आजार ठीक होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी मंदिरात मोदप्पा सेवा हा प्रमुख सोहळा पार पडतो. ज्यात गणेशाच्या मूर्तीला तूप व गोड भात म्हणजेच मोदप्पमने झाकलं जातं.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-02T124328.981.jpg)
त्रिनेत्र गणेश मंदिर , रणथंबोर
रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील हजार वर्ष जुन्या किल्ल्याच्या माथ्यावर 6500 वर्ष जुने त्रिनेत्र गणेशाचं मंदिर आहे. या मंदिराबाबत हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या लग्नाची पत्रिका या मंदिरात आली अशी कथा प्रसिद्ध आहे , ज्यामुळे देशभरातील हजारो भाविक बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी लग्नाच्या पत्रिका मंदिरात पाठवत असतात. या मंदिरात दरवर्षी गणेश मेळा या उत्सवासाठी तीन ते चार दिवसांमध्ये लाखो भक्त या मंदिराला भेट देतात
View this post on Instagram
मोटी डुंगरी गणेश मंदिर, जयपूर
मोटी डुंगरी गणेश मंदिर हे जयपूरच्या सेठ जय राम पालिवाल यांनी 18व्या शतकात स्थानिकांना शुभकार्याच्या आधी देवाचे आशीर्वाद घेता यावेत म्हणून बांधलेलं एक छोटेखानी धार्मिक स्थळ. लहानश्या टेकडीवर, दगडातून कोरत हे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराजवळच राजमाता गायत्री देवींच्या मोटी डुंगरी पॅलेस ला देखील पर्यटक आवर्जून भेट देतात. दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्त याठिकाणी मोठा सोहळा पार पडतो.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-02T123544.890.jpg)
गणेश टोक मंदिर, गंगटोक
बौद्ध भिक्षूंचे प्रसिद्ध प्रार्थनास्थळ गंगटोक येथील टीव्ही टॉवर जवळील टेकडीवर गणेशाची अनेक सुंदर मंदिर उभारण्यात आली आहेत. यापैकीच एक म्हणजे गणेश टोक मंदिर. आजूबाजूच्या परिसरातील थंड वातावरण व मंदिराच्या समोरच असणाऱ्या खंगचेन्दोझोन्गा पर्वतावरील हिरवळ हे एकूणच शांत व आल्हाददायक दृश्य अनुभवण्यासाठी लाखो भक्त या मंदिराला दरवर्षी भेट देतात.(Happy Ganeshotsav 2019 HD Images: गणरायाच्या आगमनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, HD Greetings, Wallpapers, Wishes देऊन करा आनंद द्विगुणित)
रॉकफोर्ट उच्ची पिल्लयार मंदिर, तामिळनाडू
तामिळनाडू राज्यात तिरुचिरापल्ली शहरातील टेकडीवर स्थित रॉकफोर्ट उच्ची पिल्लयार कोळी मंदिर हिंदू धर्मीयांसाठी खास आहे. या मंदिराच्या बाबत रामायणाशी संबंधित एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-02T125010.712.jpg)
करपगा विनाकर गणेश मंदिर, तामिळनाडू
करपगा विनाकर गणेश मंदिर हे तामिळनाडू मधील प्राचीन मंदिरांच्या यादीत साधारण 1600 वर्ष जुने आहे.पंड्या राजाच्या काळात पिल्लयरपट्टी येथील दगडी गुहेत गणेशासोबतच इतर देवतांचं चित्रं व शिल्प साकारत या मंदिराची बांधणी करण्यात आली आहे. ६ फूट उंच शिल्पाची, दागिन्यांनी सजवलेली गणेशाची मूर्ती पाहण्यासाठी भाविक या मंदिराला दरवर्षी भेट देतात.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-02T123852.267.jpg)
सासिव काळू व कडाळे काळु गणेश मंदिर, हंपी
सासिव काळू व कडाळे काळु गणेश मंदिर हे हंपी या तत्कालीन विजयनगर साम्राज्यातील पर्यटनाचं प्रमुख आकर्षण आहे. याठिकाणी 1440 मध्ये साकारलेल्या गणेशच्या दोन मूर्ती व इतर देवतांच्या प्राचीन मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरातील गणेशाची मूर्ती कर्नाटक राज्यातील सर्वात मोठी मूर्ती आहे. या मंदिराच्या नावांचा इतिहास पाहताना असं दिसून येतं की, रत्नांच्या अपेक्षेने दक्खन सुलतानाच्या सैन्याने या गणेश मूर्तीचे पोट फोडलं असताना संपूर्ण मूर्तीला तडा गेला होता व त्यांनतर चण्याच्या डाळीचं रूप या मूर्तीला प्राप्त झालं व त्यातून पुढे कडाळे काळू गणेश हे नाव प्रसिद्ध झाले
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/09/Untitled-design-2019-09-02T122518.302.jpg)
भारतात सणांचे महत्व अनन्यसाधारण आहे त्याच प्रमाणे हे सण साजरे करण्याची पद्धतही सर्वत्र निराळी आहे. देशातील या काही खास गणेश मंदिरात भेट देऊन तुम्ही त्यांचा गणेशोत्सव सोहळा अनुभवू शकता.यंदाचा गणेशोत्सव आपल्यासाठी मंगलमय ठरवा अशी सदिच्छा! गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!