
संकटांचा नाश करणारा, विद्येची देवता समजला जाणारा गणराय म्हणजेच गणपती बाप्पाला हिंदू धर्मिय पूजेमध्ये अग्रस्थान देतात. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणपतीच्या आराधनेने केली जाते. महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रेला एक विशेष महत्त्व आहे. पुणे शहरा नजिक वसलेल्या आठ गणपतींचे दर्शन घेतल्याने आणि मनोभावे पूजा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात अशी आराधना आहे. लेण्याद्रीचा (Lenyadri) गिरिजात्मज हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. मग जाणून घ्या लेण्याद्रीच्या गिरीजात्मजाचे नेमके वैशिष्ट्य काय? Ganesh Chaturthi 2019: गणपतीची लांब सोंड, मोठ पोट, बारीक डोळे असं गणेशाचं रूप जाणून घ्या नेमकं कशाचं प्रतिक आहे? या आहे त्यामागील अध्यात्मिक संकेत.
लेण्याद्रीचा गिरीजात्मज गणपती
गिरिजात्मज लेण्याद्री गणपती हा एकमेव गणपती लेण्यांमध्ये आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांना सुमारे 338 पायर्या चढून यावं लागतं. गिरीजात्मज या शब्दात त्याचा अर्थ दडला आहे. गिरिजा हे पार्वतीचे नाव असून आत्मज म्हणजे मुलगा, त्यामुळे गणरायाचे एक नाव गिरिजात्मज आहे. या मंदिराच्या डोंगराला पूर्णतः लेण्यांनी वेढलेले आहे. माता पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी तब्बल 12 वर्ष या लेण्यांमध्ये तपश्चर्या केली होती त्यानंतर एका तपाचं फळं म्हणून गणेश स्वयंभू प्रकट झाल्याची अख्यायिका आहे.
पुण्यात लेण्यांमध्ये वसलेले गिरीजात्मजाचे मंदीर प्राचीन कालीन असले तरीही निसर्गाच्या किमयेने इथे आजही पाण्याची दोन कुंड आहेत. बारमाही त्यामध्ये थंड पाण्याचा स्वच्छ साठा असतो. लेण्यांमध्ये हे मंदिर असल्याने या ठिकाणी अप्रतिम दर्जाचे नाजूक कोरिव काम पाहता येते. गणपतीच्या गाभार्यासमोरील सभामंडपात एकुण 18 गुहा आहेत यामध्ये ऋषीमुनींनी तपास्या केली अशी अख्यायिका आहे. मंदिरातील ओवर्यांमध्ये पेशवेकालीन चित्रशैलीचा एक उत्कृष्ट असा नमुना असलेली श्री गुरूदत्तात्रय, शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणराय, सारीपाट खेळणारा बालगणेश अशी वेगवेगळी चित्रे नैसर्गिक रंगात रंगविलेली आहेत. हे मंदिर पुण्यात जुन्नरमध्ये वसलेले आहे.
अष्टविनायक गणपती देवस्थानांपैकी एक लेण्याद्रीचा गिरिजात्मज असणारा हा गणपती भक्तांचे नवस पूर्ण करण्यासाठी जागृत देवस्थान आहे. त्यामुळे पुणे मुंबई, नाशिक, जुन्नर या भागातून अनेक भाविक हमखास या मंदिराला नियमित भेट देतात.