Ganesh Jayanti 2021 Date: माघी गणेश जयंती यंदा 15 फेब्रुवारीला; जाणून घ्या गणेश भक्तांसाठी खास असलेल्या या दिवसाचं महत्त्व!
Ganesh Durva (Photo Credits: Instagram)

Maghi Ganesh Jayanti 2021:  विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या भक्तांमध्ये गणेश चतुर्थी (Ganesh Jayanti) प्रमाणेच दरवर्षी गणेश जयंतीची देखील ओढ असते. हिंदू पंचांगानुसार आणि पुराणकथांनुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती (Ganesh Jayanti) साजरी केली जाते. मान्यतांनुसार गणपती बाप्पाचा जन्म हा माघ महिन्यातील चतुर्थीला झाल्याने ही गणेश जयंती ही गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रासह भारतामध्ये गणेश जयंतीचा हा दिवस माघी गणेश चतुर्थी, माघी विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी अशा वेगवेगळ्या नावाने देखील ओळखली जाते. यंदा हा गणेश जयंतीचा उत्सव सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 दिवशी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात घराघरामध्ये हा गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे. गणेश जयंती निमित्त ऐका मन प्रसन्न करणारी 'ही' खास गाणी.

भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणे या गणेश जयंतीला देखील काही ठिकाणी घरामध्ये गणपतीची मूर्ती विराजमान केली जाते. त्याची षोडोपचार पूजा अर्चना होते. दीड दिवसांनी माघी गणपतीचं देखील विसर्जन करण्याची पद्धत आहे.गणेश जयंतीच्या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दरम्यान ज्या व्यक्ती गणेश जयंतीला गणपती बाप्पाची पूजा आराधना करतात त्यांना संपूर्ण वर्षभराचं गणेश चतुर्थींच्या व्रताचं फळ मिळतं अशी धारणा आहे. या व्रतामुळे घरात सुख, शांती, समृद्धी वाढते मनोकामना पूर्ण होतात अशी गणपती बाप्पाच्या भाविकांची धारणा आहे. गणपती ही इष्ट देवता असल्याने तसेच विघ्नहर्ता असल्याने कोणत्याही शुभ प्रसंगी सर्वात प्रथम गणपती बाप्पाच्या पूजेला मान देण्याची हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे.

महाराष्ट्रात गणपतीच्या अष्टविनायकांसोबतच मुंबईतील सिद्धिविनायक गणपती सह अनेक गणेश मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहाने गणेश जयंती साजरी केली जाते. घरामध्ये गणेश जयंती साजरे करणारे अनेक भाविक यानिमित्ताने बाप्पाचे आवडते मोदक तीळ-गुळाच्या सारणामध्ये करतात. नैवेद्यामध्येही तीळाचा समावेश हमखास केला जातो.

गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदुर यांनी गणेश मुर्ती बनवण्याची देखील काही ठिकाणी पद्धत आहे. या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दुसर्‍या दिवशी विसर्जन केले जाते. पूजा विधींमध्ये या दिवशी सकाळी स्नान करताना तीळाच्या पेस्टने मसाज करून आंघोळ केली जाते. गणेशभक्तांसाठी खास असलेल्या या दिवशी घरगुती स्वरूपात गणेश पूजन केले जाते.