Dussehra 2020 Date and Significance: आश्विन शुद्ध दशमीला 'दसरा' किंवा 'विजयादशमी'चा सण साजरा करतात. दसऱ्याचा दिवस साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवास सुरुवात होते. नऊ दिवसांच्या या उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. देवीने महिषासुर नावाच्या दुष्ट राक्षसाशी सलग 9 दिवस युद्ध करुन दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला. दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवल्याचा हा दिवस म्हणून 'विजयादशमी' या नावाने ओळखला जातो. रामाने रावणाचा वधही याच दिवशी केला म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याच्या दिवशी देशातील विविध भागांत करण्यात येते. सूराचा असूरावर विजय, चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून दसऱ्याचा सण साजरा केला जातो. यंदा 25 ऑक्टोबर रोजी आश्विन शुद्ध दशमी असल्याने त्यादिवशी दसरा साजरा केला जाणार आहे.
सरस्वती आणि शस्त्र पूजन:
दसऱ्याच्या दिवशी पुस्तके, पोथ्या, वाद्यं, शस्त्र यांची पूजा करण्याचा रिवाज आहे. पाटी, वहीवर सरस्वतीचे प्रतिकामत्क रुप काढून पूजन केले जाते. सरस्वती ही विद्या आणि कलेची देवता असल्याने तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दसऱ्याचा शुभ मुहुर्तावर तीची पूजा केली जाते. शस्त्रं पूजनाची परंपरा पांडवांपासून सुरु झाली. पांडव अज्ञातवासात असताना वेश पालटून विराट राजाच्या घरी राहिले होते. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रं शमीच्या झाडाखाली लपवली होती. अज्ञातवासाचा कालावधी संपत असताना कौरवांनी विराट राजाच्या गाई पळवून नेल्या. त्यावेळी अर्जुनाने झाडाखालील शस्त्रं काढून घेतली आणि गाईंचे रक्षण करण्यासाठी कौरवांशी युद्ध केले. तो दिवस दसऱ्याचा होता. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. तसंच पूर्वी पावसाळा संपला की दसऱ्याच्या दिवशी शस्त्रं पूजन करुन राजे लढाईसाठी बाहेर पडत असतं.
सोने लुटणे:
दसऱ्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रुपात सोने लुटले जाते. कौत्स नावाचा शिष्य वरतंतू ऋषींकडे शिक्षण घेत होता. शिक्षण संपल्यानंतर ते गुरुदक्षिणा घेण्यास तयार नव्हते. मात्र कौत्साने फारच आग्रह केल्याने वरतंतू ऋषींनी त्याला शिकवलेल्या चौदांसाठी विद्यांसाठी प्रत्येकी एक कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली. गुरुदक्षिणेसाठी दान मागण्यासाठी कौत्स रघुराजाकडे गेला. परंतु, राजाने नुकताच विश्वजित यज्ञ केल्याने त्याचा खजिना रिकामा झाला होता. तेव्हा राजाने कौत्साकडे तीन दिवासांची मूदत मागितली आणि इंद्रावर स्वारी करुन सुवर्णमुद्रा कौत्साला देण्याचे ठरवले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित असल्याने त्याने कुबेराच्या मदतीने एका आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. रघुराजाने कौत्सास त्या मुद्रा घेऊन जाण्यास सांगितले. त्या सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स वरतंतूंकडे गेला. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ 14 कोटी मुद्रा घेतल्या. राहिलेल्या मुद्रा घेऊन कौत्स रघुराजाकडे परत गेल्यावर त्याने त्या मुद्रा घेण्यास नकार दिला. तेव्हा कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना लुटण्यास सांगितले. तेव्हापासून दसऱ्यला आपट्याच्या पानांच्या रुपात सोने लुटण्याची परंपरा सुरु झाली.
दसरा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने, नवीन वस्तू खरेदी, शुभकार्य यासाठीही हा दिवस शुभ मानला जातो. यंदा या शुभ सणावर कोविड-19 चे सावट असल्याने विशेष खबरदारी घेत सण साजरा करणे आवश्यक आहे.