'स्वप्न ती नाहीत जी रात्री झोपल्यावर येतात, स्वप्न ती आहेत जी रात्रभर झोपू देत नाही' असे अनेक प्रेरणादायी विचार आपल्यासमोर मांडणारे डॉ.एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांचा आज स्मृतिदिन. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती होते. 27 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले. कलामांना मिसाईल मॅन म्हणूनही विशेष संबोधले जायचे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे एक नावाजलेले आणि प्रसिद्ध वैज्ञानिकही होते. एका गरीब घरातून आलेल्या मच्छिमा-याचा मुलगा जेव्हा एखादा देश चालवतो, तेव्हा तो प्रवास किती खडतर असेल हे शब्दात व्यक्त करणेही कठीण आहे.
अब्दुल कलामांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला. लहानपणापासूनच ते खूप हुशार, मेहनती आणि कष्टाळू होते. अब्दुल कलामांच्या स्मृतिदिना निमित्त आज आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयी अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्यावर तुमचा कदाचित विश्वासही बसणार नाही.
1. अतिशय गरीब घरात जन्मलेल्या कलामांच्या वडिलांजवळ स्वत:चे घर चालविण्यासाठी एका होडी शिवाय दुसरे काहीही साधन नव्हते.
2. डॉ. कलाम लहानपणापासूनच खूप मेहनती होते. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे ते पाच वर्षाचे असल्यापासून पेपर विकण्याचे काम करायचे.
3. कलामांना गणित आणि भौतिक शास्त्राची खूप आवड होती. गणिताचा अभ्यास करण्याची ते रोज सकाळी 4 वाजता उठायचे.
4. कलामांना सुरुवातीपासून वैमानिक बनण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांची भारतीय वायु सेनेमध्ये निवडही झाली होती. मात्र त्यात ते 9व्या स्थानावर होते. आणि भारतीय वायुसेनेमध्ये पहिल्या 8 उमेदवारांचीच निवड होणे असा नियम होता. याचा अर्थ अगदी थोडक्यासाठी ते वैमानिक होता होता राहिले.
5. कलाम 1969 मध्ये ISRO येथे गेले आणि SLV चा प्रोजेक्ट डायरेक्टर बनले. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली पृथ्वीच्या कक्षेत रोहिणी उपग्रहाचे यशस्वी उड्डाण झाले होते. त्यामुळे पुढे त्यांना 'मिसाईल मॅन' म्हणून संबोधण्यात आले.
आज भलेही ते आपल्यामध्ये नसतील पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण नेहमीच आपल्याल प्रेरणा देणारी विशेषत: युवा पिढीला स्फूर्तिदायक ठरतील. त्यांच्या आज स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याबद्दल एकच गोष्ट सांगावीशी वाटते की, अतिशय बुद्धिमान, हुशार, धाडसी असे डॉ.एपीजे अब्दुल कलाम आता पुन्हा होणे नाही. अशा या हरहुन्नरी नेत्याला लेटेस्टलीकडून कोटी कोटी प्रणाम.