Dnyaneshwar Jayanti 2021 Quotes: आज श्रावण वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. श्रीकृष्ण जयंती दिवशीच ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म होणं हा विशेष योगायोग आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील गोदावरी नदीच्या काठावरील असलेल्या आपेगाव येथे झाला. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशी त्यांची ओळख आहे. मराठी भाषेप्रती असलेले त्यांचे प्रेम आणि लोककल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य अफाट होते. (संत ज्ञानेश्वर जयंतीच्या शुभेच्छा मराठमोळ्या HD Images, Messages च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून 'माऊलींं'ना करा अभिवादन!)
अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी भगवदतगीतेवरील ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका असे म्हणतात. ज्ञानेश्वरीत कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग सांगितला आहे. ज्ञानेश्वरी नंतर त्यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ म्हणजे अनुभवामृत किंवा अमृतानुभव. यात त्यांनी विशुद्ध तत्त्वज्ञान, जीव-ब्रह्म मिलाफ याबद्दल सांगितले आहे. आज ज्ञानेश्वर जयंती निमित्त त्यांचे काही अनमोल विचार जाणून घेऊया...
संत ज्ञानेश्वर माऊली यांचे विचार:
1. देह हा रथ आहे. त्यातील इंद्रियं घोडे असून बुद्धी सारथी आहे आणि मन लगाम आहे. त्यामुळे केवळ देहाचे पोषण करणे हा आत्मघात आहे.
2. अशी कोणतीच गोष्ट नाही जी अभ्यासाने साध्य होणार नाही.
3. कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेऊन, मी माझ्या आसपासच्या माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
4. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
5. माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात 28 अभंग आहेत. याशिवाय त्यांनी विविध अभंग, विराण्या रचल्या. विश्वकल्याणासाठी पसायदान रचून त्यांनी भक्तीचा नवा मार्ग दाखवला. वारकीर संप्रदायाचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या 21 व्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला इंद्रायणीच्या काठी समाधी घेतली.