Diwali 2018 : दिवाळी सण, वसुबारस आणि गाईची पूजा
दिवाळी, वसुबारस महत्त्व (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

हिंदू संस्कृतीत सण आणि उत्सवांना प्रचंड महत्त्व आहे. विशेष म्हणजे हिंदू संस्कृतीत विविध जात, पंथ आणि समूहाचे लोक येत असल्यामुळे त्यांचे सण साजरे करण्याच्या परंपरा आणि पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. या सर्व जात, धर्म, समुहांमध्ये दिवाळी हा सर्वात महत्त्वाचा सण. अवघ्या भारतभरात दिवाळी साजरी केली जाते. तसेच, जगभरातील अनेक देशांमध्ये राहात असलेले भारतीय नागरिकही त्या त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. दिवाळी सणाला दीपावली, दिव्यांचा उत्सव, दीपोत्सव, दिवाळसण अशा नावांनीही ओळखले जाते. दिवाळी हा साधारण पाच दिवस साजरा केला जाणारा सण. या सणाची सुरुवात होते ती वसुबारसेपासून. म्हणूनच जाणून दिवाळीच्या सणामध्ये वसुबारसेचे महत्त्व काय?

कधी असते वसुबारस?

हिंदू पंचाग आणि मराठी दिनदर्शिकेनुसार दिवाळी सणाची सुरुवात बसुबारसेपासून होते. वसुबारस ही अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी येते. या दिवसाला गोवत्स द्वादशीही म्हणूनही ओळखले जाते. खरे तर वसु बारस याचा साधा आणि सरळ सरळ अर्थ म्हणजे धनांची बारस. वसु म्हणजे धन ज्याला आपण द्रव्य असेही म्हणतो आणि बारस म्हणजे द्वादशी. यावरुनच नाव पडले वसु बारस. या सणामध्ये कृषीप्रधान भारताचे प्रतिबिंब पडल्याचे पहायला मिळते. या दिवशी संध्याकाळी गाई आणि पाडसाची पूजा केली जाते. घरामध्ये धनधान्य, संपत्ती आणि लक्ष्मीचे आमन व्हावे यासाठी ही पूजा केली जाते. ज्यांच्या घरी गुरे, वासरे, गाई असतात ती मंडळी गाईची पूजा करतात. सोबत इतर गुरांनाही पुरणपोळीचा नैव्यद्य दाखवतात.

वसुबारसेला गाईची पूजा कशी करावी?

घरातील सवाष्ण महिला गाईच्या पायांवर पाणी वाहतात. नंतर गाईच्या कपाळाला आणि पायांच्या खुरांवर हळद-कूंकू, फुले, अक्षता वाहतात. गाईच्या गळ्यात फुलांची माळ घातली जाते. त्यानंतर गाईला निरंजन असलेल्या तबकाने (ताट) ओवळले जाते. केळीच्या पानावर गाईला पुरण पोळीचा नैवेद्य दिला जातो. शक्यतो पूजा ही गाईची नेहमी देखभाल करणाऱ्या महिलेनेच करावी. इतर कोणी करत असेल तर, गाईचा स्वभाव माहित असलेली माहितगार व्यक्ती सोबत घ्यावी. कारण, नवीन माणसाला पाहून गाय बुजण्याची शक्यता असते. त्यामुळे पायावर अक्षता, हळद-कुंकू वाहताना तिने पाय झटकल्यास पूजा करणाऱ्या व्यक्तीस इजा पोहोचू शकते. गायीसाठी अगदीच नवीन असलेल्या व्यक्तीने पूजा प्रकार दूरून पाहणे केव्हाही इष्ट. (हेही वाचा, Diwali 2018 : पाडव्याच्या ओवाळणीत पत्नीला गिफ्ट देण्यासाठी '5' हटके आयडियाज !)

वसुबारस साजरी करण्याची साधारण पद्धत

दिवाळी सणाचा हा पहिलाच दिवस असल्याने अंगणात सडासंमार्जन, रांगोळी घातली जाते. अर्थात, अलिकडे राहणीमानाचा दर्जा बदलून त्यात आधुनिकीकरण आल्यने शहरांसोबत गावच्या ठिकाणीही अंगणात फरशी बसवली जाते. त्यामुळे सडासंमार्जन हा प्रकार कालबाह्य होताना दिसत आहे. मात्र, रांगोळीची प्रथा कायम आहे. अनेक महिला या दिवशी शक्यतो उपवास करतात. या दिवशी गहू, मूग खाऊ नयेत असा संकेत आहे. दिवसभर केलेला उपवास स्त्रीया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगेच्या भाजीसोबत सोडतात. शहात अनेकदा चपाती आणि इतर भाजीसोबतही उपवास सोडला जातो. आपल्या घरांतील मुले,बाळे तसेच, स्वत:सह इतर मंडळींनाही सुख, समाधान आणि आरोग्य लाभावे यासाठी ही पूजा केली जाते. स्त्रीला घरातील लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे त्यांनी केलेला उपवास अधिक लाभदायक असतो, असा समज पुराणकाळापासून चालत आला आहे. तर, मंडळी असे आहे वसुबारसेचे दिवाळी सणात महत्त्व.