Diwali 2018: वसुबारस आणी गाईची पूजा, साजरा करा दिवाळी सणाचा पहिला दिवस
दिवळी सणाचा पहिला दिवस वसुबारस (संग्रहित,संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

आज वसुबारस म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस. शाळेत जाणारी मंडळी सुट्टीच्या आनंदात किल्ला करण्यात मग्न असतील. तर, प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातून तळलेल्या खमंग पदार्थांचा सुगंध दरवळत असेल. दिवळीचे पदार्थ बनविण्यासोबतच वसुबारसेची पूजा कशी करायची याबाबत अनेक महिला विचार करत असतील. अर्थात, दिवाळी सणासोबत वसुबारसही दरवर्षीच येत असते. त्यामुळे या पूजेत विशेष असा काही बदल होत नाही. तरीही पूजा करताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्या शास्त्र, सुरक्षा आणि इतर बाबींसाठीही महत्त्वाच्या ठरतात.

गाईची पूजा करताना काय काळजी घ्याल?

वसुबारसेला प्रामुख्याने गाईची पूजा केली जाते. आता गाय म्हटलं की, तो एक पाळीव प्राणी. भलेही तिला आपण, गोमाता वैगैरे म्हणत असू तरीही. त्यामुळे गाईची पूजा करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, वर्षातून अशा सण उत्सवानिमित्त आपण एखादाच दिवस ही पूजा करतो. त्यातही हा दिवस परंपरा, चाली रिती म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. पण, गाईला या सर्वांची सवय असण्याचे कारण नाही. म्हणूनच ती तुम्हाला वाटते तितक्या शांतपद्धतीने पूजा करु देईलच असे नाही. म्हणूनच गायीची पूजा करताना काळजी घ्या. शक्यतो पूजा ही गाईची नेहमी देखभाल करणाऱ्या महिलेनेच करावी. इतर कोणी करत असेल तर, गाईचा स्वभाव माहित असलेली माहितगार व्यक्ती सोबत घ्यावी. कारण, नवीन माणसाला पाहून गाय बुजण्याची शक्यता असते. त्यामुळे पायावर अक्षता, हळद-कुंकू वाहताना तिने पाय झटकल्यास पूजा करणाऱ्या व्यक्तीस इजा पोहोचू शकते. गायीसाठी अगदीच नवीन असलेल्या व्यक्तीने पूजा प्रकार दूरून पाहणे केव्हाही इष्ट. कोणतीही पूजा आगोदर समजून घ्यावी मगच ती प्रत्यक्ष करावी असे शास्त्र सांगते. (हेही वाचा, Diwali 2018 : दिवाळी सण, वसुबारस आणि गाईची पूजा)

वसुबारस आणि गाईची पूजा

घरातील सवाष्ण महिलेने गायीच्या पयांवर पाणी वाहावे. त्याच महिलेने गाईच्या कपाळाला हळदी-कूंकू लावावे. गाईच्या गळ्यात फुलांचा हार घालून, सुटी फुले गायीच्या मस्तकी वाहावीत. निरंजन असलेल्या तबकाने गाईला (ताट) ओवळावे. केळीच्या पानावर गाईला पुरण पोळीचा नैवेद्य द्यावा. गाईचे मनोभावे दर्शन घ्यावे आणि घरात सुख, समृद्धी, संपत्ती आणि आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करावी.