Dhanteras 2020 Date & Significance: हिंदू संस्कृतीत सणांची अजिबात कमतरता नाही. विविध सणांनी नटलेल्या संस्कृतीत दिवाळी सण मोठा आणि विशेष असतो. 4-5 दिवसांच्या सणाच्या कालावधीत नवे कपडे, गोडाधोडाचे पदार्थ यांची मेजवानी असते. रांगोळी, पणत्यांची आरास, आकाशकंदील याचे कुतूहुल असते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. धनत्रयोदशी पासून दिवाळी सुरु होते. धनत्रयोदशी या नावात 'धन' हा शब्द असला तरी याचा संबंध धनाशी नाही. तर समुद्रमंथनातून निघालेल्या धन्वंतरी या विष्णुच्या अवताराचा हा सण आहे. धन्वंतरी ही आरोग्य देवता आहे. त्यामुळे आरोग्य संपदेसाठी या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. यंदा शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे.
धनत्रयोदशी दिवशी यमदीपदान केले जाते. अकाली मृत्यूपासून स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण व्हावे तसंच दीर्घायुष्य लाभावे यासाठी यमाची प्रार्थना करुन दीपदान केले जाते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला दीप लावला जातो. हा दिवा सुर्यास्तानंतर घराबाहेर, अंगणात किंवा तुळशीबाहेर दक्षिण दिशेला दिव्याची वात येईल, असा ठेवला जातो. काही ठिकाणी यासाठी कणकेचा खास दिवा लावला जातो.
यमदीप दानाची कथा:
यमदीपदानाबद्दल अशी कथा सांगितले जाते की, एके दिवशी इंद्रप्रस्थाचा राजा हंस एकदा शिकारीला गेला होता. शिकारीसाठी फिरत असताना वाटेतील एका राज्यातील हैम राजाने हंसराजाचे चांगले स्वागत केले. त्याच दिवशी हैम राजाला मुलगा झाला होता. मात्र लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशीच त्याला मरण येणार असे भाकित एका ज्योतिषाने वर्तवले होते. हंसराजाने हैमच्या राजपुत्राला वाचवण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्याने यमुना नदीतील खोल डोहात घर बांधून राजा हैमला छोट्या राजपुत्रासह तेथे ठेवले. बरीच वर्ष राजा तिथे राहिला. राजपुत्र सोळा वर्षांचा झाल्यानंतर त्याचे लग्न झाले. परंतु, हंसराजाच्या प्रयत्नांनंतरही ज्योतिषाचे भविष्य खरे ठरले. लग्नाच्या चौथ्या दिवशीच सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. राजा हैम सह संपूर्ण राजघराण्यावर शोककळा पसरली. राजपुत्राचा प्राण न्यायला आलेल्या यमदूतांनाही सर्वांचे दु:ख पाहावले नाही. तेव्हा यमदूतांनी यमराजाची प्रार्थना केली आणि असे दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशी प्रार्थना केली. तेव्हा यमराजाने सांगितले की दिवाळीच्या पाच दिवसांत यमदीनदान करणाऱ्यांच्या वाट्याला असे दु:ख येणार नाही.
विशेष म्हणजे धनतेरसच्या मुहूर्तावर 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' साजरा केला जातो. धन्वंतरीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली अशी मान्यता आहे. ही आरोग्याची देवता असल्याने 'धन्वंतरी जयंती' म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. दरम्यान, आपल्याकडे धनत्रयोदशी निमित्त सोने, नवीन वस्तूंची खरेदीही केली जाते.