Deep Amavasya 2021 Date and Time: आज दीप अमावास्या; जाणून घ्या आषाढी अमावस्या निमित्त आजची शुभ वेळ, महत्त्व
दीप अमावस्या (Photo Credits-File Image)

आषाढ महिन्याच्या समाप्तीनंतर श्रावण महिन्याला सुरूवात होते. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण हा अत्यंत पवित्र महिन्यांपैकी एक आहे. आषाढी अमावस्येला (Aashadhi Amavasya) दीप अमावास्या (Deep Amavasya) साजरी करण्याची हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे. आषाढ अमावस्येला दिव्याची अमावास्या असं देखील म्हटलं जात. या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची रीत आहे. मग जाणून घ्या नेमकं दीप पूजन करण्याचा आजचा दीप अमावास्येचा मुहूर्त काय? त्यामागील महत्त्व काय? हे देखील नक्की जाणून घ्या. नक्की वाचा: Deep Amavasya HD Images 2021: दीप अमावास्या निमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Post, Wishes पाठवून सज्ज व्हा श्रावणारंभासाठी.

दीप अमावास्या वेळ, मुहूर्त

यंदा दीप अमावस्या अर्थात आषाढ अमावास्या शनिवार, 7 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजून12 मिनिटांनी सुरू होणार असून दुसर्‍या दिवशी 8 ऑगस्ट ला संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटापर्यंत आहे.

दीप अमावास्या महत्त्व

हिंदू संस्कृतीमध्ये विविध सणसमारंभात, महत्त्वाच्या प्रसंगी दीप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे. आज दीप अमावास्या दिवशी देखील घरातील सारे दिवे घासून पुसून त्यांना प्रज्वलित करून दीप पूजन करण्याची प्रथा आहे. आजच्या दिवशी नदीमध्ये देखील स्नान करून नव्या श्रावण महिन्यासाठी सज्ज होतात. दिवा हे मांगल्यांचं प्रतिक असल्याने अग्नी प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी पूर्वजांचं स्मरण करून दान धर्म  करण्याची देखील प्रथा आहे.

आषाढ महिन्यात पावसाळी वातावरणामुळे मळभ असते त्यामध्ये श्रावणापासून नव्या महिन्यात नवी सुरूवात करताना दिव्यांचा लखलखाट करण्याची प्रथा आहे.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला असून त्यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली पुष्टी करत नाही.