भारतामध्ये मकर संक्रांतीपासून सण-उत्सवाला सुरुवात होते व त्याची सांगता होते ती दत्त जयंतीला (Datta Jayanti 2021). मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा 18 डिसेंबर, शनिवारी दत्त जयंती साजरी होणार आहे. परब्रह्ममुर्ती सद्गुरु, श्रीगुरू देव दत्त, गुरू दत्तात्रेय, दत्त भगवान अशा अनेक नावांनी महाराष्ट्रात दत्ताची पूजा होते. दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्रीदत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप आहे.
दत्त जयंती दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने अधिक कार्यरत असते, त्यामुळे या दिवशीच्या पूजेला आणि उपासनेला विशेष महत्व आहे. तर यंदा दत्त जयंतीनिमित्त तुम्ही खास मराठी Wallpapers, Messages, Images, Greetings, HD Images पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. 'श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे.
श्रीगुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. दत्त जयंतीच्या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.