Datta Jayanti 2021 Date: यंदा दत्त जयंती 18 डिसेंबरला; जाणून घ्या मार्गशीर्ष पौर्णिमेची तिथी, वेळ काय?
Datta Jayanti | File Image

हिंदू धर्मामध्ये दत्त जयंती (Datta Jayanti) हा मार्गशीर्ष महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. भगवान दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला (Margashirsha Pournima) झाल्याची आख्यायिका असल्याने या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. भगवान दत्तात्रय हे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जातात. त्यामुळे दत्त जयंतीला या त्रिमूर्तींची पूजा केली जाते. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूच्या 24 अवतारांमधील सहावा अवतार मानला जातो. दत्तात्रेय असाच एक अवतार आहे, ज्यांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले. महाराज दत्तात्रेय आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

दत्त जयंती तिथी वेळ, तारीख

दत्त जयंती 2021 यंदा 18 डिसेंबर, शनिवारी साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेची सुरूवात 18 डिसेंबरला सकाळी 7.25 ला सुरू होणार असून 19 डिसेंबरला सकाळी 10.06 ला संपणार आहे. या वेळेत दत्त जयंती साजरी केली जाऊ शकते. Margashirsha Guruvar Vrat: 9 डिसेंबरला यंदा पहिला मार्गशीर्ष गुरूवार; जाणून घ्या या व्रतासाठी घटमांडणी, पूजा कशी कराल? 

महाराष्ट्रभरात दत्त जयंती निमित्त भाविक दत्त मंदिरामध्ये मोठी गर्दी करतात. औदुंबर हे दत्ताचे आवडते वृक्ष असल्याने त्याच्या सान्निध्यामध्ये या दिवशी गुरू चरित्राचे पारायण करण्याची प्रथा आहे. पुराणांमध्ये दत्ताच्या जन्माविषयी एक कथा सांगितली आहे. त्यानुसार दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र असल्याचं सांगितलं आहे. दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान शंकर यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे दत्तात्रेयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन शक्तीची उपसना असं मानलं जातं.