छत्रपति शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

परकीय सत्तांनी संपूर्ण भारतावर कबजा केला असताना महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी 1630 साली एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. त्यांचे नाव शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या शिवाजी महाराजांनी स्वकतृत्वाने, धैर्याने आणि साहसाने परकीय आक्रमांतून होरपळणाऱ्या महाराष्ट्राला बाहेर काढले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस (Chhatrapati Shivaji Maharaj) 'शिवजयंती' (Shiv Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा शिवजयंती 19 फब्रेुवारी दिवशी शुक्रवार आहे.

शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल शिवभक्तांमध्ये वाद आहेत. त्यामुळे दोनदा शिवजयंती साजरी केली जाते. एकदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी दिवशी. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य तृतीये दिवशी. 1870 साली जोतीराव फुले यांनी पहिली शिवजयंती साजरी केली. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचा आदर्श सतत लोकांपुढे राहावा म्हणून 1895 साली शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव सुरु केला. शिवजयंती साजरी करण्याची परंपरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायम ठेवली.

सुरुवातीला शिवजयंतीचा उत्सव केवळ गडावर साजरा होत असे. नंतर महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी केली जाऊ लागली. आता शिवजयंती देशातच नाही तर परदेशातही साजरी केली जाते. शिवजयंती ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आणि पुतळ्यांना हार घातले जातात. स्वातंत्र्याचे महत्त्व पटवणारे, महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान जागृत करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.

दादोजी कोंडदेव यांच्याकडून युद्धकलेचे आणि राज्यकारभाराचे प्रशिक्षण घेतलेल्या शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 साली स्वराज्याची शपथ घेतली आणि अवघ्या महाराष्ट्राचे राजे झाले ते कायमचेच. आजचही महाराजांचे प्रती मराठी माणसाच्या मनांत असलेले स्थान अढळ आहे. आपल्या मावळी सेनेच्या बळावर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रायगड ही स्वराज्याची राजधानी होती तर ध्वज भगवा होता. तसंच स्वराज्याचा कारभार स्वभाषेत चालावा यासाठी राजव्यवहारकोश तयार करुन घेतला.

शिवाजी महाराज अत्यंत शूर, चतुर, नीतिमान आणि न्यायप्रिय होते. त्यांच्या राज्यात सर्वधर्मियांना सारखी वागणूक मिळत होती. सर्वांसाठी समान न्याय होता. त्यामुळेच त्यांचे 'शिवशाही' हे आदर्श राज्य होते.