आचार्य चाणक्य हे केवळ राजकीय सल्लागार किंवा अर्थशास्त्रज्ञ नव्हते तर ते एक दूरदर्शी आणि विद्वान शिक्षक देखील होते. त्यांना विष्णुगुप्तसह कौटिल्य या नावानेही ओळखले जाते. मौर्य वंशाच्या स्थापनेत आचार्यांचा महत्त्वाचा वाटा होता. एक शिक्षक म्हणून त्यांची धोरणे त्यांची नीती (Chanakya Niti) प्रबळ दूरदृष्टीचे परिणाम आहेत. म्हणूनच हजारो वर्षांनंतरही त्यांची धोरणे आजच्या परिस्थितीतही लागू होतात.
चाणक्य नीती ही आपल्या दैनंदिन जीवनासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त अशी सर्व सूत्रे आचार्यांनी श्लोकांच्या स्वरूपात लिहिली आहेत. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कोणतीही आपत्ती किंवा संकट आल्यास त्याने पैशाची किंवा बायकोची किंवा आणखी कशाची बाजू घ्यायला पाहिजे.
चाणक्य नीति दर्पणच्या पहिल्याच अध्यायाच्या सहाव्या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि धनाशी संबंधित काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये पैसा जास्त महत्त्वाचा की स्त्री यावर भाष्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, काळानुसार पैशाचे संरक्षण केव्हा आणि कसे करावे आणि जर पैसा आणि स्त्री यातील निवड करायची असेल तर कोणती निवड करावी. यानंतर, हे देखील सांगण्यात आले आहे की जेव्हा स्वत: च्या रक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा कोणाची निवड करावी.
आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि।
आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि॥
म्हणजे, आपत्तीच्या, म्हणजे संकटाच्यावेळी संपत्तीचे रक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. परंतु संपत्तीपेक्षाही पत्नीचे रक्षण करणे महत्वाचे आहे. कारण स्त्रीच्या सन्मानापेक्षा मोठी संपत्ती नाही. पत्नी ही घराचा सन्मान असते आणि प्रत्येक सुख-दु:खाची सोबती असते. परंतु जेव्हा स्वतःचे रक्षण करायचे असते, तेव्हा स्त्री आणि पैसा या दोन्ही गोष्टींची आसक्ती सोडणे उचित आहे. म्हणजे जेव्हा अध्यात्म, तपश्चर्या आणि मोक्षप्राप्तीसाठी पैसे आणि पत्नी या दोघांचाही त्याग करून आत्म्याला परमात्म्याशी जोडले पाहिजे.
आचार्य एक युक्तिवाद म्हणून स्पष्ट करतात- दुःखाच्या वेळी पैसा माणसाला उपयोगी पडतो. त्यामुळे जर तुमच्याकडे पैसा जमा झाला असेल तर तुम्ही तुमची संकटे कमी करू शकता. म्हणूनच प्रत्येक माणसाने पैशाची बचत करण्याची सवय लावली पाहिजे. कारण पैशात मोठी शक्ती असते, पण जर पैसा आणि पत्नी यांच्यात एकाची निवड करायची असेल, तर पत्नीचे महत्व पैशापेक्षा कैक पटीने जास्त आहे. म्हणून व्यक्तीला पैशापेक्षा पत्नीचे रक्षण केले पाहिजे. परंतु स्वरक्षणासाठी पैसा आणि पत्नीचाही त्याग करणे योग्य आहे. (हेही वाचा: गोमूत्र मानवांसाठी अतिशय हानिकारक; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा)
इथे आचार्य चाणक्यांनी पैशाचे महत्त्व कमी केले नाही, कारण पैसा एखाद्या व्यक्तीच्या संकटात मोठा साधक म्हणून काम करू शकतो, परंतु जर कुटुंबातील स्त्रीच्या जीवनाच्या सन्मानाचा प्रश्न असेल तर मनुष्याने पैशांचा विचार करू नये. पत्नी ही कुटुंबाचा सन्मान असते, ती घराची प्रतिष्ठा असते. तीच गेली, तर जीवनाचा उपयोग काय? परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा प्रश्न येतो तेव्हा त्याने पैशाची आणि पत्नीच्या सर्व चिंता बाजूला ठेवून आपला जीव वाचवला पाहिजे, कारण तो जगला तरच तो आपल्या पत्नीचा किंवा पैशाचा वापर करू शकेल, अन्यथा सर्वकाही व्यर्थ ठरेल.