
अनेक लोकांकडून तुम्ही गोमूत्राचे (Cow Urine) फायदे ऐकले असतील. काही आजारांमध्येही गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला जातो. आता गोमूत्र संदर्भात भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे (IVRI) नवीन संशोधन समोर आले आहे. गोमूत्र हे मानवांसाठी घातक ठरू शकते, असा दावा संस्थेने केला आहे. अशा परिस्थितीत गोमूत्र थेट पिणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे IVRI ने म्हशीचे मूत्र हे गोमूत्रापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे सांगितले आहे.
तीन पीएचडी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत असलेले संस्थेचे भोजराज सिंह यांना संशोधनात असे आढळून आले आहे की, गोमूत्रात कमीतकमी 14 प्रकारचे हानिकारक जीवाणू असतात. यासोबतच त्यामध्ये Escherichia coli देखील आढळते. या जीवाणूंमुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका असतो. हे संपूर्ण संशोधन रिसर्चगेट या ऑनलाइन पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले आहे.
भोजराज सिंह हे महामारीविज्ञान विभागाचे प्रमुख आहेत. संशोधनात साहिवाल, थारपारकर आणि विंदावणी या तीन प्रकारच्या गायींचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय माणूस आणि म्हशीच्या मूत्राच्या नमुन्यांचाही समावेश करण्यात आला होता. भोजराज सिंह यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी विशेष संवाद साधताना सांगितले की, या संपूर्ण संशोधनाचा निष्कर्ष काढण्यासाठी त्यांनी गाई आणि म्हशींचे 73 मूत्र नमुने गोळा करून सांख्यिकीय संशोधन केले आहे. ज्यामध्ये त्यांना आढळले की, गोमूत्रापेक्षा म्हशीचे मूत्र जास्त फायदेशीर आहे. म्हशीच्या मुत्रामध्ये S Epidermidis आणि E Rhapontici सारखे जीवाणू अधिक प्रभावी असतात. (हेही वाचा: बिअरमध्ये आढळले कॅन्सरचा धोका वाढवणारे रसायन; समोर आला धक्कादायक अहवाल, शास्त्रज्ञांनी दिला इशारा)
गेल्या वर्षी जून ते नोव्हेंबर 2022 पर्यंत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला. या संपूर्ण संशोधनानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले की निरोगी व्यक्तीच्या मूत्रातही धोकादायक जीवाणू असतात. गाईचे दूध हे जीवाणूविरोधी असते.पण याचा अर्थ आपण गोमूत्र सेवन करावे असा अजिबात नाही. ते मानवांसाठी चांगले नाही. मात्र, गायीच्या डिस्टिल्ड युरीनमध्ये अत्यंत घातक बॅक्टेरिया असतात की नाही यावर संशोधन सुरू असल्याचेही भोजराज सिंह यांनी स्पष्ट केले. आयव्हीआरआयचे माजी संचालक आर.एस. चौहान यांनी सांगितले होते की, गायीचे डिस्टिल यूरीन कर्करोग आणि कोविडशी लढण्यासाठी प्रभावी आहे.