RTI (PC - Facebook)

तुम्ही किती कमावता? आपल्यापैकी अनेकांना अशा प्रश्नांची उत्तरे देणे आवडत नाही. सहसा लोक या गोष्टींची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देतात. मात्र, वैवाहिक नात्यात वाद सुरू असताना त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. जेव्हा घटस्फोट दोघांच्या संमतीने होत नाही, तेव्हा पत्नीला पतीचे उत्पन्न (Salary) जाणून घ्यायचे असते.

अशा परिस्थितीत पतीने आपले उत्पन्न जाहीर करण्यास नकार दिल्यास पत्नीकडे ते शोधण्याचे इतर मार्ग आहेत. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका महिलेने माहितीच्या अधिकाराद्वारे (RTI) आपल्या पतीच्या उत्पन्नाची माहिती मागितली आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) प्राप्तिकर विभागाला आदेश दिले आहेत की, महिलेला तिच्या पतीच्या उत्पन्नाची माहिती 15 दिवसांत द्यावी. (हेही वाचा - डॉक्टरांना गर्भपात करणार्‍या अल्पवयीन मुलींची ओळख उघड करण्याची गरज नाही - सर्वोच्च न्यायालय)

CIPO ने यापूर्वी माहिती देण्यास दिला नकार -

संजू गुप्ता नावाच्या महिलेने पतीचे उत्पन्न जाणून घेण्यासाठी आरटीआय दाखल केली होता. सुरुवातीला, बरेलीच्या आयकर विभागाच्या केंद्रीय जन माहिती अधिकारी (CPIO) यांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती देण्यास नकार दिला. कारण, पतीने यासाठी संमती दिली नव्हती. त्यानंतर महिलेने प्रथम अपील प्राधिकरणाकडे (एफएए) अपील दाखल करून मदत मागितली. FAA ने CPIO चा आदेश कायम ठेवला, त्यानंतर गुप्ता यांनी CIC कडे दुसरे अपील दाखल केले.

केंद्रीय माहिती आयोगाने 19 सप्टेंबर रोजी याबाबत आदेश जारी केला. यासाठी सीआयसीने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या निर्णयांचा हवाला दिला. सीआयसीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महिलेला तिच्या पतीचे उत्पन्न जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे CIPO ने 15 दिवसांच्या आत पतीच्या उत्पन्नाची माहिती द्यावी.