(संपादित आणि संग्रहित प्रतिमा)

आम आदमी पार्टी (आप). एखाद्या आंदोलनातून तयार झालेली पण, अल्पावधीतच एका राज्याची बहुमताने सत्ता काबिज केलेला बहुदा एकमेव राजकीय पक्ष. समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथून केलेल्या आंदोलनाची या पक्षाला पार्श्वभूमी आहे. देशातील भ्रष्टाचाराला विरोध आणि लोकपाल कायदा लागू करण्यात यावा, याबाबत हे आंदोनल होते. या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय हवा चांगलीच तापली होती. या तापलेल्या हवेतूनच भारतीय प्रशासकीय सेवेत असलेल्या अरविंद केजरीवाल यासारख्या उच्चपदस्त अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा पक्ष स्थापन झाला. अनपेक्षीतपणे या पक्षाने राजधानी दिल्लीची सूत्रे हाती घेतली. स्वत: अरविंद केजरीवाल हेच उच्चशिक्षीत असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेऊन विविध क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवर मंडळी या पक्षाकडे आकृष्ट झाली. पण, इतर राजकीय पक्षांप्रमाणे या पक्षालाही बंड किंवा नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून जायचे ग्रहण लाहले. पाहा आम आदमी पक्षाला आजपर्यंत कोणी-कोणी दिली सोडचिठ्ठी...

आशीष खेतान: पत्रकार ते राजकीय नेता, असा प्रवास असलेल्या आशीष खेतान यांनी 15 ऑगस्टला आपला रामराम केला. पक्ष सोडताना त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्ष सोडताना त्यांनी पक्षांतर्गत राजकारण आणि इतर इतर गोष्टींबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी कोणावरही आरोप न करता केवळ आपण व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

आशुतोष: अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आशुतोष हेसुद्धा आपमधून बाहेर पडले आहेत. आशुतोष हे एक धडाडीचे पत्रकार होते. अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी उच्च पदांवर काम केला आहे. पत्रकारीतेतील बराच मोठा अनुभव त्यांना आहे. या सर्व पदांचा राजीनामा देत आशुतोष हे पत्रकारीतेतून बाहेर पडले आणि त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. आशुतोष यांनीही व्यक्तिगत कारण पुढे करत आपचा राजीनामा दिला आहे.

कपिल मिश्रा: कपिल मिश्रा यांचे आपमधून बाहेर पडणे हे इतर सदस्यांपेक्षा काहीसे वेगळे होते. कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर मे 2017मध्ये आप आदमी पार्टीच्या राजकीय समितीने (पीएसी) मिश्रा यांना पक्षातून काढून टाकले.

मयंक गांधी: भ्रष्टाचाराविरूद्ध लढाई लढणारा एक सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेले मयांक गांधी हे आपच्या टीममधील एक महत्त्वपूर्ण घटक होते. त्यांनी एक पक्ष कार्यकर्ता म्हणूनही काम केले. ते आपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते. पण, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या मतभेदातून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जात आहे. पण, त्यांनीही आपण व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगत 2015मध्ये पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

योगेंद्र यादव: समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील लोकआंदोलनाचे (2011) मुख्य रणनितीकार असलेले योगेंद्र यादव हे आपचे सह-संस्थापक होते. पण, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत (2015) यादव यांना अनौपचारिकरित्या पक्षातून बरखास्त करण्यात आले. हा निर्णय अत्यंत धक्कादायक होता. पण, त्यावर यादव यांनी दिलेली प्रतिक्रिया प्रचंड बोलकी होती. 'ते म्हणाले होते, या निर्णायाचे मला काहीच आश्चर्य वाटत नाही. कारण, गेल्या काही दिवसांपासून पक्षात काहीतरी हालचाल सुरू असल्याचे मला जाणवत होते. हे प्रकरण या दिशेला जाईल असे मला वाटत होते. पण, मला मोठा धक्का बसला आहे ही गोष्ट मला नाकारताही येणार नाही.'

प्रशांत भूषण: सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम पाहिलेले प्रशांत भूषण हे आम आदमी पक्षाचा एक चेहरा होते. आप हा पक्ष भ्रष्टाचार आणि द्वेशमुक्त असल्याचे सांगत ते पक्षात सहभागी झाले होते. पण, त्यांनाही योगेंद्र यादव, आनंदर कुमार यांच्याप्रमाणेच पक्षातून बेदखल करण्यात आले.

आंनद कुमार: आम आदमी पक्षाचे सह-संस्थापक राहिलेले योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्याप्रमाणेच आनंद कुमारही पक्षाचे वरिष्ठ नेते होते. पण, त्यांनाही आपमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यानंतर आनंद कुमार हे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या 'स्वराज अभियान' या बिगरराजकीय आंदोलनात सहभागी झाले.

दरम्यान, मधू भादूडी, अजीत झा, अंजली दमानिया, विनोद कुमार बिन्नी, कॅप्टन जीआर गोपीनाथ, शाजिया इल्मी, अशोक अग्रवाल, मोलाना कासमी, एमएस धीर, एस पी उदयमुकार यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी आणि बऱ्याच पक्ष कार्यकर्त्यांनीही आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.