Coronavirus (Photo Credits: Pixabay)

Covid-19 Cases in India: गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या कमी झाली होती. मात्र, आता कारोनाचा नवीन व्हेरिएंट (Covid-19 New JN.1 Variant) पुन्हा डोक वर काढू लागला आहे. कोरोनाचा नवीन प्रकार, JN.1 ची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढू लागली आहेत. आतापर्यंत 40 देशांमध्ये या व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. याशिवाय भारतातही 23 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गोव्यात सर्वाधिक 19 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच राजस्थानमध्येही दोन प्रकरणे समोर आली आहेत. तथापी, केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत केरळमध्ये 300 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच 3 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या आता 72,059 वर पोहोचली आहे. (हेही वाचा -Covid-19 And JN-1 Updates: नवीन 300 संक्रमितांसह देशभरात कोरोनाचे 2,669 रुग्ण, जेएन-वन विषाणूचाही वाढता धोका; केरळमध्ये तिघांचा मृत्यू)

देशभरात आज 358 कोरोना रुग्णांची नोंद -

देशातील कोविड-19 रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आता 2669 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आज देशभरात 358 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

केरळमध्ये आढळला JN.1 प्रकाराचा पहिला रुग्ण -

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोविड चाचणी वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच जे नमुने पॉझिटिव्ह आढळले ते जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगितले आहे. देशातील कोरोनाच्या JN.1 प्रकाराचा पहिला रुग्ण केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये आढळून आला होता. (हेही वाचा, COVID-19 Update: JN.1 सबव्हेरियंटबद्दल चिंता नको; INSACOG प्रमुखांकडून दिलासा)

WHO ने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे -

WHO ने कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत एक सल्लाही जारी केला आहे. अॅडव्हायझरीमध्ये लोकांना मास्क घालण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापि, WHO ने म्हटलं आहे की, सध्याची लस या कोरोना प्रकारावर पूर्णपणे प्रभावी असून घाबरण्यासारखे काही नाही.

अमेरिकेत कोरोनाच्या JN.1 प्रकाराचा पहिला रुग्ण 8 डिसेंबर रोजी आढळून आला. आकडेवारीनुसार, अमेरिकेत आढळलेल्या नवीन कोरोना प्रकरणांपैकी 30 टक्के रुग्ण या प्रकारातील आहेत.