Submarine Optical Fibre Cable: भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान 2300 किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल (Optical Fibre Cable) समुद्रात टाकण्यात आली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. हा प्रकल्प युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) च्या देखरेखीत पूर्ण करण्यात आला आहे. या युएसओएफचे संचालक विलास बुरडे आहेत. श्री. बुरडे महाराष्ट्राचे असून त्यांनी मर्यादित वेळेत या प्रकल्पाची जबाबदारी पार पाडली.
दरम्यान, सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्वीपांना जोडली जाणार आहे. या जोडणीमुळे देशातील इतर भागांप्रमाणेच अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल आणि लँडलाईन दूरध्वनी सेवा जलद आणि अधिक विश्वासार्ह होणार आहे. (हेही वाचा - भारतात गेल्या 24 तासात 7 लाखांहून अधिक COVID19 च्या सॅम्पल्सची टेस्ट, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती)
चेन्नई ते पोर्ट ब्लेअर दरम्यान सबमरीन ओएफसी लिंक 2 x 200 जीबीपीएस प्रतिसेकंद बँडविड्थ असणार आहे. आणि पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान 2 x 100 जीबीपीएस असणार आहे. यामुळे टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सुविधांची तरतूद करता येईल. आधी मिळत असलेल्या मर्यादित सेवांचे रूपांतर आता जलद गतीत होणार आहे. त्यामुळे 4 जी मोबाईल सेवांमध्ये मोठ्या सुधारणा होणार आहेत.
या प्रकल्पाच्या टेलिकॉम आणि ब्रॉडबँड जोडणीमुळे बेटांवर पर्यटन व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच रोजगार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेली-एज्युकेशन या ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होण्यास मदत होईल.