केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडून शिवसेनेचे कौतुक म्हणाल्या 'राम मंदिर हे केवळ भाजपचेच पेटंट नाही'
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि उमा भारती, केंद्रीय मंत्री (Archived, edited, symbolic images)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा देशभरात चांगलाच गाजला. त्यानंतर राम मंदिर आणि हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला विविध स्थरातून पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ महिला उमा भारती यांनीही शिवसेनेला राम मंदिराच्या मुद्द्यावर पाठिंबा दर्शवत शिवसेनेचे कौतुकही केले आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा कौतुकास्पद आहे. अयोध्येत राम मंदिर हे केवळ भाजपचे पेटंट नाही, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

उमा भारती यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्याकडून राम मंदिरासाठी होत असलेले प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत. राम मंदिर हे केवळ भाजपचे पेटंट नाही. भगवान राम हे सगळ्यांचे आहेत. मी समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, अकाली दल तसेच, ओवेसी आणि आजम खान यांनाही अवाहन करते की, त्यांनीही राम मंदिराच्या उभारणीस पाठींबा द्यावा.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यात मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर लवकरात लवकर झाले पाहिजे. मग त्यासाठी अद्यादेश आणा किंवा कायदा करा. वाट्टेल ते करा पण राम मंदिर उभारा. जर सरकारला जमत नसेल तर, राम मंदिर उभारणे आम्हाला जमत नाही, असे सरकारने स्पष्ट करावे आणि आगामी निवडणुकीत तो मुद्दाही उपस्थित करु नये, असेही ठाकरे म्हणाले. अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यानी 'पहिले राम मंदिर मग सरकार' असा नाराही दिला होता. (हेही वाचा, छप्पन इंचवाल्यांच्या हाती कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या तरीही, अयोध्येत राम मंदीर नाही: शिवसेना)

जर राम मंदिर उभारता येत नसेल तर. अयोध्येत राम मंदिर उभारणार, हे सत्तेत येण्यापूर्वी दिलेले केवळ अश्वासन होते, असे सरकारने स्पष्ट करावे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन काही मंडळींनी शिवसेनेवर टीकाही केली आहे.